भारतीय स्वातंत्र्य दिन भाषण
आजच्या
कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित शिक्षक वर्ग आणि माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो.
आज आम्ही 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन साजरा
करण्यासाठी जमलेलो आहोत. आपल्या देशामध्ये
आपण सर्व धर्माचे वेगवेगळे सण उत्सव साजरे करीत असतो. पण यामध्ये 15 ऑगस्ट या राष्ट्रीय
सणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण भारतीयांना 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या
दीडशे वर्षांच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले.
ब्रिटिश लोक व्यापाराच्या निमित्ताने समुद्रामार्गे
भारतात आले. त्यावेळी हिंदुस्तान मध्ये अनेक छोटी-छोटी राज्ये संस्थाने अस्तित्वात
होती. त्यांच्यामध्ये एकतेचा अभाव होता. एकमेकात हाडवैर होते. याचाच फायदा घेत इंग्रजांनी
एक हातात तराजू व एक हातात बंदूक घेऊन एक एक करत संपूर्ण भारत देश स्वतःच्या अंमलाखाली
आणला आणि भारत स्वातंत्र्य गमावून पारतंत्र्यात गेला.
भारतीयांनी
पुन्हा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध अनेक लढे दिले पण जनतेमध्ये एकता
नव्हती. ठराविक भागात उठलेले बंड इंग्रज बंदुकीच्या व शक्तीच्या जोरावर दडपून टाकीत
असत. इंग्रजांनी दहशत दडपशाही व भारतीयावर नाना प्रकारचे अत्याचार करून जरब बसविली
होती भारत देशातील विविध मौल्यवान संपत्ती
लुटून इंग्लंडला पाठविली.
इंग्रजांनी
भारतीय संस्कृतीच्या खुणा मिटवून भारतीयांच्या मनातील स्वातंत्र्यतेच्या जाणिवा पुसण्याचा
प्रयत्न केला. अनेक ठिकाणी धर्मांतरे घडविली.
पण भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची
देशभक्तीची ज्योत व आस धगधगत होती. वेगवेगळ्या मार्गाने इंग्रजांच्या विरुद्धचे लढे
आंदोलने तीव्र रूप धारण करीत होते.तस तसे ही आंदोलने चळवळी दडपण्यासाठी इंग्रजांचे घोर अत्याचार वाढत होते. हे अत्याचार कसे होते याची कल्पनाच करवत नाही.
इंग्रजांच्या अत्याचाराला भीक न घालता स्वतंत्र
लढा तीव्र बनत चालला होता. अनेक स्वतंत्र वीर शहीद झाले. कितीतरी अपंग बनले. अनेकांच्या
घरादाराची राखरांगोळी झाली. कित्येक भूमिगत झाले. संपूर्ण भारतभर परकीयांच्या विरुद्धचा
आंदोलनाचा वणवा पेटत होता. कारागृहे भरत होती. सत्याग्रहींना मारझोड होत होती डोकी फुटत होती.
लोकमान्य टिळक महात्मा गांधीजी, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर, नेताजी सुभाष चंद्र बोस, सुखदेव, शहीद भगतसिंग, झाशीची राणी, लक्ष्मीबाई,
तात्या टोपे, वासुदेव फडके, कित्तूर चन्नम्मा, इत्यादी ज्ञात-अज्ञात क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिकांनी
अनेक मार्गांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले.
आंदोलने चळवळी सत्याग्रह उपोषणे इत्यादी मार्गांनी इंग्रजांच्या विरुद्ध रान
पेटविले होते.
संपूर्ण भारतभर लढा पसरला होता. भारतीयांच्या
प्रखर लढा पुढे इंग्रजांना झुकावे लागले. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश परकीय
इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.
म्हणूनच आम्ही दरवर्षी प्रमाणे आजही स्वतंत्र
दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर
भारतीयांनी प्रगतीच्या दिशेने चौफेर प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे.
भारतासमोरील समस्यांचे आव्हान पेलून त्या दूर
करून आमचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सर्वांनी प्रखर देशभक्तीने प्रेरित होऊन
देशसेवेसाठी कटिबद्ध होऊया ही प्रेरणा मिळण्याचा हा पवित्र दिवस.
देशासाठी
लढलेल्या सर्व स्वतंत्र वीरांना, शहिदांना सैनिकांना माझा मानाचा मुजरा करून मी माझे
भाषण संपवतो.
जय
हिंद! जय भारत!
माने Govt. MHPS Belgundi.