केशवा माधवा तुझ्या नामात
केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा ॥धृ॥
तुझ्यासारखा तूच देवा,
तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा
केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा ॥१॥
वेडा होऊन भक्तीसाठी,
गोपगड्यांसह यमुनाकाठी
नंदा घरच्या गाइ हाकिशी,
गोकुळी यादवा
केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा ॥२॥
वीर धनुर्धर पार्थासाठी,
चक्र सुदर्शन घेऊन हाती
रथ हाकुनिया पांडवांचा,
पळविशी कौरवा
केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा ॥३॥