शब्दांच्या जाती,नाम व नामाचे प्रकार
मुखावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनीना ‘वर्ण‘ असे म्हणतात. अक्षरांना ध्वनी चिन्ह म्हणतात.
शब्द – शब्द हा वाक्यातील महत्वपूर्ण घटक आहे.
म,पग,पतट,सरग यामध्ये कांही अक्षरे व कांही शब्द आहेत.पण त्यांचा कांही अर्थ लागत नाही.पण तो.मी,कमल,मगर,बबन,रोहित हे अक्षर किंवा शब्द वाचले तर त्यांचा कांही तरी अर्थ समजतो म्हणून शब्द म्हणजे
अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे शब्द.
(ज्या एक किंवा अनेक अक्षरांच्या समुहापासून कांही अर्थ समजतो.त्याना शब्द म्हणतात.बोलणे शब्दांनी बनते.
वाक्य – अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य.
उदा. – मी शाळेला जातो.
शब्दांच्या जाती
आपण दररोज अनेक वाक्ये बोलतो किंवा लिहितो.त्यामध्ये अनेक शब्द असतात.ह्या शब्दांची निरनिराळी कामे असतात.त्या शब्दांच्या कामावरून त्यांचे प्रकार ठरविले जातात.
वाक्यात जे शब्द येतात त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कार्ये असतात त्यांच्या कार्यावरून त्याना वेगवेगळी नावे दिलेली आहेत त्याला शब्दांच्या जाती असे म्हणतात.
मराठीत शब्दांच्या जाती आठ आहेत.(शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार.)
1) नाम
2) सर्वनाम
3) विशेषण
4) क्रियापद
5) क्रियाविशेषण अव्यय
6) शब्दयोगी अव्यय
7) उभयान्वयी अव्यय
8) केवलप्रयोगी अव्यय / उद्गारवाचक अव्यय
शब्दांच्या जाती दोन प्रकारात विभागल्या आहेत.
1) विकारी शब्द – वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रुपात लिंग,वचन,विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द
म्हणतात.
विकारी म्हणजे बदल घडणारे.
उदा. 1. मित्राने लाडू दिला.
या वाक्यात ‘मित्र‘ या मूळ शब्दाचा वापर करताना ‘मित्राने‘ असा बदल केला आहे.
1) नाम
2) सर्वनाम
3) विशेषण
4) क्रियापद
हे चार विकारी शब्दांचे प्रकार आहेत.
2) अविकारी शब्द
– वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रुपात लिंग,वचन,विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द म्हणतात.
अविकारी म्हणजे बदल न घडणारे.
1) क्रियाविशेषण अव्यय
2) शब्दयोगी अव्यय
3)उभयान्वयी अव्यय
4) केवलप्रयोगी अव्यय /उद्गारवाचक अव्यय
हे चार विकारी शब्दांचे प्रकार आहेत.
शब्दांच्या जातीची व्याख्या व उदाहरणे खालीलप्रमाणे –
1) नाम – व्यक्ती, वस्तू, पदार्थ,स्थळ यांची नावे व त्यांच्या गुणधर्मांना नाम असे म्हणतात.
उदा. मुलगा, मुलगी, झाड, पक्षी, गाव, घर, धर्म, नीती इ.
आतापर्यंत आपण नामाविषयी माहिती मिळविली आहे. तरीही पुन्हा एकदा त्याचा अधिक अभ्यास करु.त्यासाठी पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे निरीक्षण करा.
1.सुनील हा खूप हुषार मुलगा आहे.
2. हिमालय हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे.
3. मलप्रभा ही नदी खानापूरजवळून वाहते.
4. माणसाच्या अंगी नम्रता व सचोटी असावी.
वरील वाक्यातील प्रत्येक अधोरेखित शब्द पाहा.
§ ‘सुनील‘ हे मुलाचे नाव आहे.
§ ‘हिमालय‘ हे पर्वताचे नाव आहे.
§ ‘खानापूर‘ हे गावाचे नाव आहे.
§ नम्रता‘ व ‘सचोटी‘ ही व्यक्तींच्या
गुणांची नावे आहेत.
अशा प्रकारच्या सर्व शब्दांना व्याकरणात ‘नाम‘ म्हणतात.
§ प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या कोणत्याही वस्तूला किंवा तिच्या गुणधर्माला जे नाव दिले जाते. त्याला नाम असे म्हणतात.
उदा. मुलगा, वार, देव, सिंह, कावेरी, चाफा, शौर्य, धिटाई.
नामाचे 3 प्रकार आहेत.
1.सामान्यनाम
2. विशेषनाम
3. भाववाचक नाम
1.सामान्यनाम –
एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यतः जी नावे देण्यात येतात.त्यांना ‘सामान्यनाम‘ म्हणतात.
उदा. नदी , देश , मुलगी
2. विशेषनाम –
ज्या नामामुळे एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्ती,प्राणी किंवा वस्तूच्या विशिष्ट नावाचा बोध होतो त्या नामास विशेषनाम असे म्हणतात.
उदा. कावेरी , भारत , राधिका
3. भाववाचक नाम-
ज्या नामामुळे प्राणी, वस्तू, स्थळ इत्यादींचे गुण, स्वभाव, स्थिती यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात.
(य, त्व, पण/ पणा, गिरी-वा-ई/आई- ता यासारखे प्रत्यय लागुन भाववाचक नामे तयार होतात.)
उदा. गोडी , शौर्य, प्रामाणिकपणा
(थोडक्यात – नदी हे सामन्यानाम तर कावेरी हे विशेषनाम आणि गोडी हे भाववाचक नाम आहे.