मराठी व्याकरण शब्दांच्या जाती
शब्दांच्या जाती बद्दल समजून घेण्यापूर्वी वर्ण,अक्षर,शब्द व वाक्य यांच्याबद्दल समजून घेऊया..
मुखावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनीना ‘वर्ण’ असे म्हणतात. अक्षरांना ध्वनी चिन्ह म्हणतात.
शब्द – शब्द हा वाक्यातील महत्वपूर्ण घटक आहे.
म,पग,पतट,सरग यामध्ये कांही अक्षरे व कांही शब्द आहेत.पण त्यांचा कांही अर्थ लागत नाही.पण तो.मी,कमल,मगर,बबन,रोहित हे अक्षर किंवा शब्द वाचले तर त्यांचा कांही तरी अर्थ समजतो म्हणून शब्द म्हणजे –
अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे शब्द.
(ज्या एक किंवा अनेक अक्षरांच्या समुहापासून कांही अर्थ समजतो.त्याना शब्द म्हणतात.बोलणे शब्दांनी बनते.
वाक्य – अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य.
उदा. – मी शाळेला जातो.
आपण दररोज अनेक वाक्ये बोलतो किंवा लिहितो.त्यामध्ये अनेक शब्द असतात.ह्या शब्दांची निरनिराळी कामे असतात.त्या शब्दांच्या कामावरून त्यांचे प्रकार ठरविले जातात.
वाक्यात जे शब्द येतात त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कार्ये असतात त्यांच्या कार्यावरून त्याना वेगवेगळी नावे दिलेली आहेत त्याला शब्दांच्या जाती असे म्हणतात.
मराठीत शब्दांच्या जाती आठ आहेत.(शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार.)
1) नाम 5) क्रियाविशेषण अव्यय
2) सर्वनाम 6) शब्दयोगी अव्यय
3) विशेषण 7) उभयान्वयी अव्यय
4) क्रियापद 8) केवलप्रयोगी अव्यय / उद्गारवाचक अव्यय
शब्दांच्या जाती दोन प्रकारात विभागल्या आहेत.
1) विकारी शब्द – वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रुपात लिंग,वचन,विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द म्हणतात.
विकारी म्हणजे बदल घडणारे.
उदा. 1. मित्राने लाडू दिला.
या वाक्यात ‘मित्र’ या मूळ शब्दाचा वापर करताना ‘मित्राने’ असा बदल केला आहे.
1) नाम
2) सर्वनाम
3) विशेषण
4) क्रियापद
हे चार विकारी शब्दांचे प्रकार आहेत.
2) अविकारी शब्द – वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रुपात लिंग,वचन,विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द म्हणतात.
अविकारी म्हणजे बदल न घडणारे.
1) क्रियाविशेषण अव्यय
2) शब्दयोगी अव्यय
3)उभयान्वयी अव्यय
4) केवलप्रयोगी अव्यय / उद्गारवाचक अव्यय
उदा. मुलगा, मुलगी, झाड, पक्षी, गाव, घर, धर्म, नीती इ.
2 ) सर्वनाम – नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला ‘सर्वनाम’ म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सार्वनामिक शब्द वापरला जाते.
उदा. मी,आम्ही,तू,तुम्ही,आपण इत्यादी.
3) विशेषण – नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ‘विशेषण’ म्हणतात.
उदा. लाल, पिवळा, हुशार, गोड, कडू, दहा, लहान इ.
4) क्रियापद – वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला ‘क्रियापद’ म्हणतात.
उदा. खातो, आहे, गेला, लिहितो इ.
5 ) क्रियाविशेषण अव्यय – क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ‘क्रिया विशेषण’ (अव्यय) असे म्हणतात.
उदा. संथ, सावकाश, जलद, मागे, पुढे, फार इ.
6) शब्दयोगी अव्यय – जे शब्द नामांना व सर्व नामाना जोडून येतात व शब्दामधील संबंध दाखवितात त्या शब्दांना ‘शब्दयोगी अव्यय’ से म्हणतात.
उदा. झाडावर, टेबलाखाली, घरामागे त्याच्यामुळे इ.
7) उभयान्वयी अव्यय – दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्दाना किंवा वाक्यांना जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यव असे म्हणतात.
उदा. आणि, व, किंवा, पण, परंतु, म्हणून, कारण इ.
8) केवलप्रयोगी अव्यय – ज्या शब्दांनी आपल्या मनातील भाव व्यक्त करता येतात. त्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. हे शब्द आपल्या तोंडातून सहजपणे बाहेर पडतात.
उदा. : अबब!, अरेरे!, शाबास!, वाहवा!, छे! इ.