सारे काही खूप सोपे असते; असा आपण एका दृष्टीने विचार केला आणि दुसऱ्या दृष्टीने विचार केला, तर सारे काही अत्यंत कठीण! आपण आपल्या आयुष्याकडे कसे पाहतो यावर सारे काही अवलंबून आहे. आपल्याला जे करायचे आहे ते कोणालातरी शक्य असते आणि जे कोणालातरी करायचे आहे ते आपल्याला शक्य असते. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सारे गुण क्वचितच कोणा व्यक्तीकडे असतात, पण ज्यांच्याकडे असे गुण असतात ते आपले स्वप्न अगदी सहज पूर्ण करतात, आणि इतर लोक केवळ आवाक होऊन त्यांच्याकडे पहात राहतात.
आपण आपल्याच विचारांच्या पिंजऱ्यात अडकलेलो असतो. आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी असतात, ज्या आपण अशक्य आहेत,आपल्याला त्या जमणार नाहीत म्हणून सोडून देतो,पण खरंच त्या गोष्टी अशक्य असतात का? की केवळ त्या आपल्याला शक्य नसतात? या संकुचित विचारांच्या पिंजऱ्यातून बाहेर पडून आपण याकडे एकदा मोकळेपणाने पाहायला हवे.आपण आपल्याच विचारात दिवस काढत असतो,आयुष्य जगत असतो.कारण त्यात आपणाला सुरक्षितता वाटते. पण आपल्या या संकुचित विचारांच्या बाहेरही एक जग असते आणि या जगातच आपली स्वप्ने वसलेली असतात.असा विचार करून जर आपले आयुष्य जगलो तर…..!!बघा पटतंय का?