न्याय

          न्याय 
कथा क्र. ११

         लोकांचे धान्य दळून देणार्‍या एका माणसाने एके दिवशी आपल्या धान्याच्या टोपलीत एक उंदीर पकडला व त्यास आपल्या आवडत्या मांजरास खाऊ घालण्याचा विचार केला. त्यावेळी तो उंदीर दीनवाणें तोंड करून त्याला म्हणाला, ‘बाबारे लोकांचं धान्य चोरावं हा माझा धंदा नाही.’ लोकांच्या घरातून मी जे अन्न घेतो, ते केवळ पोटापुरतेच घेतो,’ ही सबब ऐकून तो माणूस म्हणाला, ‘अरे, मी तरी तुला जी शिक्षा करणार आहे, ती सार्वजनिक हितासाठीच करतो आहे.

 कारण तुझ्यासारख्या चोराला शिक्षा करणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे,’ हे ऐकून उंदीर म्हणाला, ‘बरं तर, तू आणि मी दोघंही एकाच वर्गात मोडतो याचा विचार कर. आपण दोघेही धान्यावरच आपला चरितार्थ चालवतो. अंतर इतकंच की दळायला आलेल्या धान्यातला एक दाणा जर मी चोरला तर त्यातले हजार दाणे तू चोरतोस.’ तो माणूस रागावून त्यावर म्हणतो, ‘प्रामाणिक माणसाने शांतपणे ऐकून घेण्याजोगे हे तुझे बोलणे नाही.’ व लगेच त्याने त्या उंदरास आपल्या मांजरीस देऊन टाकले.

तात्पर्य – ज्या व्यंगाबद्दल आपण दुसर्‍यास नावे ठेवतो, तेच व्यंग आपल्या अंगी आहे असे दाखवून दिले, तर त्याचा आपल्याला राग येतो, पण हा काही न्याय नव्हे.

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now