सदाचार

सदाचार



कथा क्र. १२ 
सदाचारी असेल तरचं लक्ष्मी, दान यांचा वास असतो

महाभारतकालीन राजा सत्यदेव एक दिवस सकाळी उठले, तर त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडताना दिसली. राजाने आश्‍चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्यावर त्या स्त्रीने सांगितले, ‘मी लक्ष्मी आहे, आता या राजवाड्यातून मी जात आहे.’ तेव्हा राजाने तिला सांगितले, ‘तू जाऊ शकतेस.’ लक्ष्मी बाहेर पडली. नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडताना पाहून राजाने त्यालाही विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्याने उत्तर दिले, ‘माझे नाव ‘दान’ आहे. लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही; म्हणून मीही तिच्यासह जात आहे.’ राजाने सांगितले ‘आपणसुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता.’ त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष ‘यश’ निघून गेला. त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला अन् बाहेर पडू लागला. तेव्हा राजाने त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचे नाव विचारले. तो पुरुष म्हणाला, माझे नाव ‘सदाचार ! राजाने त्याला म्हटले, ‘मी तर तुझा कधीच त्याग केला नाही. तू मला सोडून का जात आहेस ? तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे. मी तुला जाऊ देणार नाही. तू मला सोडून गेलास, तर माझे सर्वस्व जाईल !’ राजाचे हे बोल ऐकून सदाचार राजवाड्यातच थांबला. सदाचार बाहेर पडला नाही, हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी, दान आणि यशही परत आले.

तात्पर्य :- सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे. जीवनात सदाचार (नीतीमत्ता, धर्माचरण आदी) नसेल, तर दान, लक्ष्मी (श्रीमंती) आदींचा काहीच उपयोग नाही.




Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now