आदेश दिनांक: 26.03.2025
राज्यातील सर्व सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शौचालयांची स्वच्छता विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात आधीच संबंधित शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शाळांचे मुख्याध्यापक यांना अधिकृत पत्राद्वारे सूचित करण्यात आले होते.
तथापि, अलीकडे काही घटनांमधून असे निदर्शनास आले आहे की, काही शाळांमध्ये अजूनही विद्यार्थ्यांकडून शौचालयांची साफसफाई केली जात आहे. ही गोष्ट शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतली असून, अशा कृतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर आता कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या सूचना व आदेश पाळणे बंधनकारक असून, त्यांचे उल्लंघन केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.यामध्ये प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला जाईल व संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षण विभाग अधिकारी यांना थेट जबाबदार धरले जाईल.
पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांकडून शौचालय स्वच्छता करवून घेण्याची कृती पूर्णतः थांबविण्याचा इशारा पुन्हा एकदा दिला गेला आहे. आधीच्या पत्रातील सर्व बाबींचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पालक, शिक्षक व शालेय प्रशासनाने या सूचनेचे गांभीर्य ओळखून त्वरित अंमलबजावणी करावी.