इयत्ता – आठवी
विषय – मराठी
पाठावरील प्रश्नोत्तरे
22. संत वाणी
अगा वैकुंठीच्या राया
संत परिचय –
संत कान्होपात्रा: कान्होपात्रा या महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांपैकी एक महत्त्वाच्या संत होत्या. त्या 15व्या शतकात जन्मल्या. त्यांचा जन्म मंगळवेढा गावात शामा नावाच्या गायिका आणि नर्तकीच्या पोटी झाला होता. शामाला वाटत होते की तिच्या मुलीनेही तिच्यासारखाच व्यवसाय करावा, पण कान्होपात्रेला तो व्यवसाय आवडत नव्हता. तिने संपूर्ण आयुष्य विठ्ठलाचे दर्शन घेण्यात आणि त्याच्या भक्तीत घालवले. कान्होपात्रेने एकूण 23 अभंग लिहिले,ज्यात विठ्ठल भक्तीची ओढ स्पष्ट दिसून येते.
मूल्य: भक्ती
साहित्य प्रकार: प्राचीन काव्य
संदर्भ ग्रंथ: सकळ संत गाथा
मध्यवर्ती कल्पना: विठ्ठल भक्तीची गोडी आणि त्याचा ध्यास.
संत कान्होपात्रेच्या या अभंगात भक्तीमय प्रेमाने विठ्ठलाला साद घालण्यात आली आहे.कान्होपात्रा विठ्ठलाला वैकुंठाचा राजा, नारायण, वसुदेवाचा पुत्र, पुंडलीकाला वर देणारा आणि रुख्मिणीचा प्रियकर या विविध रूपांत संबोधते.तिने संपूर्ण विठ्ठलाला शरण जाऊन विठ्ठलाकडे रक्षणाची विनंती केली आहे.या अभंगातून विठ्ठल भक्तीची गोडी आणि त्याचा ध्यास दिसून येतो.
शब्दार्थ आणि टीपा –
वैकुंठ: विष्णूचे निवासस्थान
राया: राजा
सखया: मित्र
अगा: अरे
वासुदेवनंदन: श्रीकृष्ण किंवा पांडुरंग
कांता: पत्नी
राखी: वाचव किंवा रक्षण कर
टीप:
कलावंतीण: गाणे आणि नृत्य करून लोकांचे मनोरंजन करणारी स्त्री.
स्वाध्याय
प्र. 1: खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. वैकुंठीचा राया कोण आहे?
उत्तर: वैकुंठीचा राया विठ्ठल आहे.
2. पुंडलिकास वर देणारा कोण आहे?
उत्तर: पुंडलिकास वर देणारा विठ्ठल आहे.
3. रखुमाईचा कांत कोण आहे?
उत्तर: रखुमाईचा कांत विठ्ठल आहे.
प्र. 2: खालील प्रश्नाचे उत्तर पाच-सहा वाक्यात लिहा.
1. वरील कवितेचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर: कान्होपात्रा ही शामा नावाच्या कलावंतीणीची मुलगी होती. तिच्या आईला वाटत होते की कान्होपात्रेनेही तिच्यासारखा व्यवसाय करावा, पण कान्होपात्रेला तो आवडत नव्हता. तिला फक्त विठ्ठलाचे दर्शन हवे होते. ती विठ्ठलाला म्हणते, “अरे वैकुंठीचा राजा, माझा मित्र विठ्ठल, पांडुरंग, पुंडलिकाला वर देणारा तूच आहेस. अरे रखुमाईच्या पती, तूच माझे रक्षण कर.” कान्होपात्रेच्या या अभंगांमधून विठ्ठल भक्तीची ओढ दिसते. संकटात विठ्ठलच तिला मदत करेल, असे तिला वाटते.