नव्या युगाचे गाणे
–कवयित्री श्रीमती शुभदा दादरकर
नव्या युगाचे नवीन गाणे एक दिलाने गाऊ
मानवतेचा दीप अंतरी नित्य तेवत ठेऊ
अज्ञानाचा तिमिर सारुनी तेजोमय हा सूर्य उगवला
विज्ञानाच्या नभोमंडळी आपण तारे होऊ ।। 1 ।।
रंग आपला वेगवेगळा सूर आपला एकसारखा
अनेकतेतून एकत्वाचे गाणे आपण गाऊ ॥2 ॥
हातामध्ये हात गुंफुनी देशहिताचा मंत्र जपोनी
हासत खेळत ध्येयमंदिरी पुढे पुढे रे जाऊ ॥3॥
भारतभूची पवित्र माती प्रिय आम्हाला स्वर्गाहुनही
या धरणीचे रक्षण करण्या प्राण पणाला लावू ॥4॥
अ.नवीन शब्दांचा अर्थ
अंतरी – मनात
तेवणे – प्रकाशत राहणे
तिमिर – अंधार
ध्येय – प्राप्त करुन घेण्याचे उद्दिष्ट
सारणे – बाजूस करणे
नित्य – सतत
आ. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही.
1. नव्या युगाचे गाणे कसे गाण्यास सांगितले आहे?
उत्तर – नव्या युगाचे गाणे एक दिलाने गाण्यास सांगितले आहे.
2. विज्ञानाच्या नभोमंडळी आपणास काय होण्यास सांगितले आहे?
उत्तर – विज्ञानाच्या नभोमंडळी आपणास तारे होण्यास सांगितले आहे.
3. कशाचा तेजोमय सूर्य उगवला आहे?
उत्तर – अज्ञानाचा अंधार बाजूला करणारा तेजोमय सूर्य उगवला आहे.
4. अनेकतेतून आपणास कोणते गाणे गाण्यास सांगितले आहे?
उत्तर – अनेकतेतून आपणास एकत्वाचे गाणे गाण्यास सांगितले आहे.
5. ध्येय गाठण्यासाठी आपणास काय करण्यास सांगितले आहे?
उत्तर – ध्येय गाठायचे असल्यास आपणास पुढे पुढे जाण्यास सांगितले आहे.
6. भारतभूमीची माती कशी आहे?
उत्तर – भारतभूमीची माती पवित्र आहे.
7. प्राण कशासाठी पणाला लावायचे आहेत?
उत्तर –भारतभूमीचे रक्षण करण्यास प्राण पणाला लावायचे आहेत.
इ. पुढे दिलेल्या कवितेच्या ओळींचा तुझ्या शब्दात अर्थ स्पष्ट कर.
1. ‘मानवतेचा दीप अंतरी नित्य तेवत ठेवू‘.
उत्तर – सर्वांनी एकमेकातील वाद विसरून आपल्या मनात माणुसकीचा दीप सतत तेवत ठेवूया व आपली प्रगती साधूया असे कवयित्री वरील ओळीतून म्हणत आहेत.
2. ‘विज्ञानाच्या नभोमंडळी आपण तारे होऊ‘.
उत्तर – सद्याच्या आधुनिक युगात विज्ञानाचा तेजोमय सूर्य उगवला आहे.त्याच्या सहाय्याने अज्ञानाचा अंधार दूर करूया व अनेक नवीन शोध लावून विज्ञानाच्या आकाशातील तारे होऊया. असे कवयित्री म्हणत आहेत.
3.‘रंग आपला वेगवेगळा सूर आपला एकसारखा‘.
उत्तर – आपल्या देशात अनेक धर्म,जाती,पंथाचे लोक एकतेने आनंदाने राहूया व अनेकतेतून एकत्वाचे गाणे एका सुरात गाऊया. असे कवयित्री म्हणत आहेत.
ई.गाळलेल्या जागा भरा.
1.हातामध्ये हात गुंफुनी देशहिताचा मंत्र जपोनी.
2. नव्यायुगाचे गाणे या कवितेच्या कवयित्री श्रीमती शुभदा दादरकर आहेत.
उ.नमुन्याप्रमाणे लिही.
नमुना -: दीप अंतरी तेवत ठेवू.
1.नभोमंडळी आपण तारे होऊ
2. एकत्वाचे गाणे आपण गाऊ
3.ध्येयमंदिरी पुढे पुढे रे जाऊ
4.प्राण पणाला लावू