मरावे परी कीर्ती रुपे उरावे
यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारला होता, ‘सत्य काय?’ युधिष्ठिराने उत्तर दिले होते “मृत्यु‘. उत्तर ऐकून यक्षाला समाधान वाटले. कारण जन्मलेला प्रत्येकजण कधी ना कधी मरणार असतो. मरण हेच सत्य.ज्याला हे जनन मरणाचे रहाडगाडगे समजले तो खरा विद्वान, तो त्याच्या आयुष्याचा समाजाच्या सेवेसाठी उपयोग करतो.
नाशकात सरकारवाडा म्हणून पेशव्यांची कचेरी आहे. त्यासमोर एक स्मारक आहे वीर बापूराव गायधनीचे. काय केले त्याने म्हणून त्याला वीर ही उपाधी लावून त्याचे स्मारक केले?
पेशवेकालीन एका वाड्याला आग लागली. एका वाड्याची आग दुसऱ्या वाड्याकडे पसरू लागली. वाड्यातील माणसं होरपळू लागली. त्यांची अर्भके भाजू लागली. कारण बाहेर पडायला मार्ग उरला नव्हता. सर्वत्र आगीमुळे धूर व बाहेर बघ्यांची गर्दी, ओरडाआरडी, रडारड. एका वाड्यात खाली होता गाई म्हशींचा गोठा. गोव्यातील गवताने पेट घेतला. गाई, म्हशी, त्यांची वासरे, दाव्याला बांधलेली. ती भाजू लागली. ओरडू लागली. समोर साक्षात मृत्यु उभा होता. त्याने त्याचा कराल जबडा उघडला होता. ‘अग्नेय स्वाहा‘ म्हणत तो एकएक वस्तु नष्ट करत होता. त्यांची राख होत होती.
त्याठिकाणी एक तरूण होता. त्याचे नाव बापूराव गायधनी. त्याने त्या आगीतून वाड्यात प्रवेश केला. जीवाची पर्वा केली नाही. मुलांना गाद्यात गुंडाळून वरच्या मजल्यावरून खाली टाकले. मोठ्यांना पाठीवर घेऊन खाली उड्या टाकल्या. माणसाचे प्राण वाचवले. आता राहिली होती जनावरं. मुकी जनावरे हंबरत होती ती, जीवाच्या आकांताने. दावे तोडण्याचा प्रयत्न करत होती. बापूरावने या वाड्यात पुन्हा प्रवेश केला. गाईंची सुटका केली. वासरांची सुटका केली. म्हशींना मोकळे सोडले. आगीतून सर्व जनावरे सुसाट पळाली. त्यांचे प्राण वाचले. माणसे वाचली. जनावरे वाचली. मात्र धुरामुळे त्याला समोरचे दिसेना. तो तेथेच अडकला. अग्नीने बापूरावाचा घास घेतला.बापूराव गेला. बाहेर उभे असलेले मोठ्याने ओरडले. पण ओरडून काय उपयोग, आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचे सामर्थ्य असावे लागते. ते त्यांच्याजवळ कुठे होते?
आगीचे थैमान संपले आग विजली पण बापूराव भस्मसात झाला. दुसऱ्यासाठी करताना त्याने त्याच्या प्राणाची आहुती दिली होती अग्नीला. ती मिळताच अग्नी शमला. बापूरावाचा घास घेऊन, गाईचे प्राण वाचवून बापूरावने त्याचे गायधनी नाव सार्थक करून दाखवले.त्याचे स्मारक लोकांनी मग सरकारवाड्यासमोर उभारले. संगमरवरी फरशी बसवली आणि त्यावर लिहिलेय.‘मरावे परी कीर्ती रुपे उरावे‘
बापूराव देहाने या जगातून गेला. मात्र पुढल्या अनेक पिढ्यांसाठी त्याने आदर्श उभा करून ठेवला. खरेच बापूराव अग्नीत जळून मेला का? नाही. त्याने तर समर्थांची ही उक्ती कृतीत आणून सत्य करून दाखवली. बापूराव अमर झाला.
देह त्यागिता. कीर्ती मागे उरावी
मना सचना हेचि क्रिया धरावी।
मना चंदनाचे परित्वा झिजावे
परि अंतरी सजना निववावे ॥
समर्थ रामदास