विज्ञान सोपे प्रयोग
विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी व वैद्न्यानिक दृष्टीकोन वाढीस लागावा या उद्देशाने हे प्रयोग इंटरनेट व सोशल मिडीयाच्या माध्यमातून संकलित केले असून विद्यार्थ्यांनी हे प्रयोग आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावे.
स्त्रोत – मराठी विज्ञान परिषद पुणे http://mavipapunevibhag.blogspot.com/
करून पहा साधे सोपे प्रयोग भाग-1
1. पानामागे दडलंय काय ?
साहित्य – झाडाची पाने, मोठ्या तोंडाच्या बाटल्या.
कृती – वीतभर उंचीची मोठ्या तोंडाची बाटली घ्या. तुमच्या आसपास असणारी झाडे न्याहाळा.
ज्या झाडांची पाने दोन सेंटामीटरपेक्षा लांब आहेत त्याची तपासणी करा. पान न मोडता
वाकवून पानाच्या खालच्या बाजूला पहा. ज्या पानाखाली पुंजक्यात घातलेली अंडी दिसतील
अशी एक दोन पाने तोडून घ्या. बाटलीत उभी ठेवा. झाकण लावा. काही काळाने अंड्यातून
अळ्या बाहेर आलेल्या दिसतील. त्यावेळी त्याच प्रकारची आणखी एक-दोन पाने बाटलीत
भरा. झाकण लावण. रोज निरीक्षण करा. अळ्या वाढतील, कोश करतील, कोशाचे रंग बदलतील, किडे बाहेर येतील.विशिष्ठ झाडावर विशिष्ठ
कीडे आढळतील.
2. तुरटीची लाही.
साहित्य – तुरटी, लांब दांडीचा चमचा, रुमाल, धगीचे साधन, काड्यापे.
कृती – एक लांब दांडीचा
चमचा घ्या. दांडीच्या टोकाला रुमाल गुंडाळा. चमच्याच्या खोलगट आकाराच्या पावपट
लहान आकाराचा तुरटीचा तुकडा घ्या. तो चमच्याच्या मध्याभागी ठेवा. चूल, स्टोव्ह, गॅस पैकी कोणतेही एक साधन पेटवा. त्याच्या
धगीवर चमच्यातला तुरटीचा खडा तापवा. तो फुगून त्याची लाही होते.तुरटीच्या स्फटिकात
पाणी असते. तापवल्यावर त्याची वाफ जोराने बाहेर फेकली जाते. तुरटीच्या तुकड्याचा
आकार वाढतो – यालाच तुरटीची
लाही म्हणतात.
3. जलशोषक पदार्थ.
साहित्य – तूर डाळ, मीठ, रवा, पोहे, पाणी, फडके.
कृती – आपले हात स्वच्छ धुवून फडक्याला पुसून कोरडे
करून घ्या. एक मूठ तूर डाळीने भरून घ्या. मुठीच्या अंगठ्याजवळच्या पोकळीतून मुठीत
एकदोनदा फुंकर मारा. मूठ सरळ करून उघडा. तूर डाळीचे दाणे दमट होवून एकेकमेकांना
चिकटलेले दिसतील. तूर डाळ जलशोषक आहे. त्याचप्रमाणे मीठ, रवा, पोहे इ. घेऊन
प्रयोग करून पहा.काही पदार्थ बाष्प शोषून दमट होतात. कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, सिलिका जेल इत्यादी पदार्थ कापडाच्या छोट्या
पिशव्यात भरून औषधे कोरडी राखतात.
4. हैड्रोजन वायू.
साहित्य – बाटली, पाणी, ड्रेनेक्स, फुगे, दोरी.
कृती – एक उभी लहान तोंडाची बाटली घ्या. बाटलीत एक
तृतीयांश उंचीपर्यंत पाणी भरा. बाटलीच्या तोंडावर बरोबर बसेल असा एक फुगा घ्या.
कात्रीने ड्रेनेक्सची पुडीच्या कोपर्याला काप द्या. ड्रेनेक्सच्या पूडीतून सुमारे
दोन ग्रॅम पूड बाटलीतल्या पाण्यात टाका. बाटलीच्या तोंडावर फुगा अडकवा. फुगा फुगला
की दोरीने बांधून घ्या. हा फुगा हवेत तरंगतो.ड्रेनेक्समध्ये दाहक सोडा आणि
अॅल्युमिनियमचा चुरा असतो. त्याच्या क्रियेने हैड्रोजन वायू तयार होतो. ड्रेनेक्स
काळजीपूर्वक हाताळा.
5. उष्णतेने प्रसरण की आकुंचन?
साहित्य – अॅल्युमिनियम
फॉईल, उदबत्ती, काड्यापेटी.
कृती – एका बाजूने अॅल्युमिनियम आणि दुसर्या बाजूने कागद असलेली फॉईल घ्या.
बिस्किटाचे पुडे तसेच सिगारेटची पाकीटे यांमध्ये असा कागद असतो. या कागदाच्या १
सेंमी रुंद आणि ५ सेंमी लांब पट्ट्या तयार करा. एक पट्टी चकचकीत भाग बाहेर ठेवून
उभ्यात दुमडा. दुसरी पट्टी चकचकीत भाग आत ठेवून उभ्यात दुमडा. दोन्ही पट्ट्या
कोनाच्या आकारात टेबलवर ठेवा. एक उदबत्ती पेटवून घ्या. पेटत्या टोकाने
पट्ट्यांच्या कोनाकाराच्या मध्यभागी धग द्या.दोन्ही पट्ट्या विरूद्ध प्रकारात
वळतात. अॅल्युमिनियम कागदापेक्षा जास्त उष्णता शोषून अधिक प्रसरण पावतो. त्यामुळे
पट्ट्यांचा आकार वक्र आणि विरूद्ध दिशांना होतो.
करून पहा साधे
सोपे प्रयोग भाग-2
1.पाण्याची उकळी थांबवा
साहित्य – छोटे पातेले, पाणी, शेगडी, साखर, चमचा.
कृती – एक छोटे पातेले घ्या. ते पाण्याने अर्धे भरा. शेगडी पेटवून त्यावर पातेले
ठेवा. पातेल्यातल्या पाण्याला खळखळ उकळी फुटू द्या. उकळत्या पाण्यात दोन चमचे साखर
पटकन टाका. उकळी थांबते. पुन्हा उकळी फुटली की दोन चमचे साखर पटकन टाका. उकळी
थांबते. असे किती वेळा करता येते ते करून पहा. नोंदवा.
एखादा पदार्थ
पाण्यात विरघळला की पाण्याचा उत्कलनांक वाढतो. त्यामुळे आहे त्या तापमानाला उकळी
थांबल्याचे दिसते. हाच प्रयोग मीठ घेऊन करून पहा.
पाण्याची उकळी वाढवा.
साहित्य – छोटे पातेले, पाणी, शेगडी, चहापत्ती, चमचा.
कृती – एक छोटे पातेले घ्या. ते पाण्याने अर्धे भरा. शेगडी पेटवून त्यावर पातेले
ठेवा. पातेल्यातल्या पाण्याला खळखळ उकळी फुटू द्या. उकळत्या पाण्यात एक चमचा
चहापत्ती टाका. पाण्याची उकळी वाढते. ती कमी झाली की पुन्हा एक चमचा चहापत्ती
टाका. उकळी वाढते.चहापत्तीतील काही घटक गरम पाण्यात विरघळणारे आहेत त्यांच्यामुळे
पाण्यात रंग उतरतो.चहापत्तीत चोथा भरपूर असतो. त्यात हवा अडकून बसलेली असते, ती उष्णतेने बाहेर येते. तसेच चहापत्तीला टोके
असतात. टोकांमुळे बुडबुडे बनण्याला वाव मिळतो. उकळी जास्त फुटलेली दिसते. हाच
प्रयोग भुस्सा वापरून करून पहा.
उकळीला चमच्याची मदत.
साहित्य – छोटे पातेले, पाणी, शेगडी, लांब दांडीचा चमचा.
कृती – एक छोटे पातेले घ्या. त्याच्या आतल्या भागात कोठेही पोचा आलेला नको, पातेले करपलेले नको, घाण अडकलेले नको. त्यात पाऊण पातेले पाणी
भरा. शेगडीवर उकळायला ठेवा. उकळी फुटल्यावर धग कमी करा. उकळीचे बुडबुडे कमी झाले
की एक लांब दांडीचा चमचा घेऊन तो पाण्याच्या बुडाशी टेकवून तळाला खरवडा.
खरवडलेल्या जागी पाणी उकळते.एखादा द्रव उत्कलनांकाइतका तापला तरी बुडबुडा तयार
होण्यासाठी टोकदार जागा लागते.
कोमट पाणी लागेल उकळायला.
साहित्य – सिरींज किंवा पिचकारी, पातेले, पाणी, शेगडी.
कृती – एका पातेल्यात पाणी घ्या. शेगडीवर गरम करा.
पाणी उकळू देऊ नका. इंजेक्शनची सिरींज किंवा पिचकारी घ्या. सिरींजची सुई काढून
बाजूला ठेवा. सिरींज किंवा पिचकारीचे टोक गरम पाण्यात ठेवून दट्ट्या मागे ओढा.
थोडे पाणी आत जाऊ द्या. सिरींज किंवा पिचकारी पाण्याच्या बाहेर काढा. टोकावर बोट
ठेवून दट्ट्या मागे ओढा. आतले पाणी कोमट असतानाच उकळलेले दिसेल.दट्ट्या मागे
ओढताना आतल्या कोमट पाण्यावरचा दाब कमी होतो. दाब कमी की उत्कलनांक कमी होतो
म्हणून कोमट पाणीही उकळते.
न तापवताच बुडबुडे.
साहित्य – छोटे पातेले, पाणी, लांब दांडीचा
चमचा, झाकण.
कृती – एक पातेले घ्या. नळाच्या पाण्याने पूर्ण भरा. पाण्यात एक लांब दांडीचा चमचा
ठेवा. धक्का लागणार नाही अशा ठिकाणी हे सारे झाकून ठेवा. काही तासाभराने उघडून
पहा. पातेल्याच्या कडेला तसेच चमच्यावर बुडबुडे आलेले दिसतील. नळाचे पाणी क्लोरीन
वायूने शुद्ध केलेले असते. पाण्यात विरघळलेला वायू टोकाची जागा मिळताच
बुडबुड्याच्या स्वरूपात बाहेर पडतो.
कोणता तळपाय मोठा ?
साहित्य – तुम्ही स्वत:, मोठ्या आकाराचा कागद, कात्री, टोकदार
पेन्सिल
कृती – एक मोठ्या आकाराचा कागद घ्या. त्याच्या एका
बाजूला तुमचा डावा पाय पूर्णपणे टेकवा. टोकदार पेन्सिलीने त्या पायाची बाह्यरेषा
काढा. बाह्यरेषेने तयार झालेली ही बाह्याकृती कात्रीने कापून घ्या. अशाच प्रकारे
उजव्या पायाची बाह्याकृती कापून घ्या. या दोन्ही बाह्याकृती एकमेकांवर ठेवून
त्याच्यांत काही फरक पडलेला दिसतो का ते बघा. तुम्हाला दोन तळपायातले अंतर लक्षात
येईल.
एक तळपाय
दुसर्या तळपायापेक्षा मोठा असल्याचे आढळते. अनेकांच्या तळपायांचे बाह्याकार घेऊन
तपासा. डावखुर्यांचा डावा तळपाय मोठा असतो का ?
तळपायावरचा भार
मोजा
साहित्य – तुम्ही स्वत:, वजन काटा, परात, पाणी, कुंकू किंवा मऊगाळ चिखल, मोठा आलेखाचा कागद. कृती – वजन काट्याचा
वापर करून तुमचे वजन पहा. ते नोंदवून ठेवा. तळपाय बुडतील एवढे पाणी एका परातीत
घ्या. त्यात कुंकू किंवा मऊगाळ चिखल घालून दाट गंध तयार करा. परातीशेजारी एक
आलेखाचा मोठा कागद जमिनीवर ठेवा. परातीत एक एक पाय बुडवून त्याचा एक एक ठसा
आलेखाच्या कागदावर उमटवा. ठशांचा मिळून आकार किती चौरस सेंटीमीटर आहे ते मोजा.
त्या आकाराला तुमच्या वजनाने भाग द्या. त्यावरून तुमच्या तळपायावर किती भार पडतो
ते समजेल.
किड्याची चाल
साहित्य – किडा, छोटी पिशवी, कुंकू, पाणी, छोटी ताटली, पांढरा कागद.
कृती – एक संथ चालणारा किडा शोधा. तो हलकेच एका छोट्या पिशवीत ठेवा. एका छोट्या
ताटलीत कुंकू आणि पाणी घालून गंध तयार करा. एक पांढरा कागद सपाट जमिनीवर पसरा.
छोट्या पिशवीतून हलक्या हाताने किडा उचलून त्याचे पाय गंधात बुडवा. मग किडा पांढर्या
कागदाच्या मध्यावर ठेवा. त्याला त्याच्या मर्जीने हलू द्या. किड्याच्या पायांच्या
क्रमाचे निरीक्षण करा. दोन पायात पडलेल्या अंतराचे निरीक्षण करा. किड्याला तीन
उजवे आणि तीन डावे पाय असतात. त्यांचा क्रम सांगण्यापेक्षा तपासून पहाण्यात शोध
लागल्याचे समाधान मिळेल.
रंगीत ज्योत
साहित्य – कागद, मीठ, चुना, बोरीक पावडर, निळी ज्योत.
कृती – हाताने फाडत एका खडबडीत कागदाच्या उभ्या
पट्ट्या करा. कागदाच्या कडेला बारीक बारीक तंतू दिसतील अशी पट्टी घ्या. पट्टी
मीठात बुडवा. तंतूंमध्ये मीठाचे काही कण उचलले जातील. हे कण एका निळ्या ज्योतीत
जाळा. कण पेटतील तशी ज्योत सोनेरी पिवळ्या रंगाची होईल. अशाच प्रकारे चुन्यामुळे
ज्योत विटकरी रंगाची होईल तर कॅरमसाठी वापरल्या जाणार्या बोरीक पावडरमुळे ज्योत
हिरवट होईल. प्रत्येक मुलद्रव्याची ज्योत वेगळ्या रंगाची असते. सोडीयमची सोनेरी
पिवळी, कॅल्शियमची विटकरी, बोरॉनची हिरवट इ.
बर्फाच्या बोटाने उचला तांदूळ
साहित्य – तुम्ही स्वत:, पेला, पाणी, बर्फ, ताटली, तांदूळ, रुमाल.
कृती – एका ताटलीत तांदूळ पसरून ठेवा. बोटाच्या चिमटीने तांदूळाचा एक एक दाणा उचलून
घेण्याचा सराव करा. एका पेल्यात थोडे बर्फाचे तुकडे घाला. पेला पाण्याने भरा. या
बर्फाच्या पाण्यात बोटे बुडवून गार होऊ द्या. त्यानंतर हात बाहेर काढून बोटे
रुमालाने कोरडी करा. आता बोटांच्या चिमटीने तांदूळाचा एक एक दाणा उचलता येतो का
पहा. बोटे गार पडल्यावर मेंदूचे संदेश त्यांच्यापर्यंत नीट पोचत नाहीत
करून पहा साधे
सोपे प्रयोग – 3
खार्या पाण्याचे
गोडे पाणी.
साहित्य – खारे पाणी, परात, जड भांडे, प्लॅस्टिकचा कागद, दोरी, काचेची गोटी.
कृती – एक परात घ्या. परातीच्या मध्यभागी परातीपेक्षा कमी उंचीचे एक जड भांडे ठेवा.
परातीत खारे पाणी (विहिरीचे मचूळ पाणी किंवा समुद्राचे, खाडीचे पाणी) भरा. आतल्या जड भांड्यापेक्षा
पाण्याची पातळी कमी ठेवा. परातीवर दोरीच्या सहाय्याने एक प्लॅस्टिकचा कागद ताणून
बांधा. कागदावर एक काचेची गोटी ठेवा. गोटी मध्यभागी जाऊन थांबेल आणि गोटीच्या
वजनाने प्लॅस्टिकचा कागद थोडा वक्राकार होईल. हे उपकरण दिवसभर ऊन असेल अशा ठिकाणी
ठेवा. पाणी तापेल, त्याची वाफ होईल, प्लॅस्टिकच्या कागदावर पाण्याच्या थेंबाच्या
रुपात सांद्रिभूत होईल. कागदाच्या मध्याकडे घरंगळत जाईल. जड भांड्यात शुद्ध पाणी
थेंब थेंब पडेल.पाण्याचीच वाफ होते, त्यातल्या
क्षाराची होत नाही.
2. सूर्यफुलातल्या बियांची रचना.
साहित्य – सूर्यफूल, खडू.
कृती – एक काढणीला आलेले सूर्यफूल घ्या. त्याच्या
वाळलेल्या पाकळ्या हलके काढा. एक खडू हातात घ्या. सर्वात मधली बी शोधून काढा. त्या
बीला लागून असलेली बी या दोन्हींचे मध्यबिंदू खडूने जोडा. दुसर्या बीला लागून
असलेली एक बी अशी शोधून काढा की ती चक्राकार मांडणीत बसेल. अशा पद्धतीने सर्वात
कडेच्या बी पर्यंत पोचेल असा चक्राकार कंस काढा. आता दुसरी सर्वात आतली आणि खडूची
खूण नसलेली बी शोधा. तिच्यापासून सुरू होणारा आधीच्या कंसाच्या दिशेत वळणारा दुसरा
कंस काढा. असे एकाच दिशेने जाणारे सर्व कंस काढा. मग विरुद्ध दिशेने जाणारे कंस
काढा.५५ कंस एका
दिशेचे तर ८९ कंस विरूद्ध दिशेचे येतात. या संख्या फिलोनसी मालिकेतल्या सलग संख्या
आहेत.
3. रम्य गुणोत्तर
साहित्य – एक हात, पट्टी.
कृती – आपल्याला हाताची लांबी मोजायची आहे. कोपरापासून मनगटापर्यंतची लांबी मोजा.
नोंदवून ठेवा. (क). कोपरापासून मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजा. नोदवून ठेवा. (ह).
मनगटापासून मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजा, नोदवून ठेवा.
(ब). ह आणि क यांचे गुणोत्तर काढा. तसेच क आणि ब
यांचे गुणोत्तर काढा. दोन्हीचे उत्तर सुमारे १.६१८ येते.या गुणोत्तराला रम्य
गुणोत्तर म्हणतात. एका सरळ रेषेचे दोन असमान भाग गेले की मोठा खंड आणि पूर्ण रेषा
यांचे गुणोत्तर, लहान खंड आणि मोठा खंड यांच्या गुणोत्तर इतके
असेल तर त्याला गम्य गुणोत्तर म्हणतात. आपला हात रम्य गुणोत्तरात असतो.
४. बसल्या बसल्या वीज.
साहित्य – प्लॅस्टिकची खुर्ची, कृत्रीम धाग्याचे कापड, एक व्यक्ती.
कृती – एका व्यक्तिला एका प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसवा. एक कृत्रिम धाग्याने बनवलेला – नायलॉन, टेरिलिन, पॉलिइस्टर यांपैकी – कापडाचा मोठा
तुकडा घ्या. सदरा, साडी काहीही चालेल. त्या कापडाने खुर्चीवर
बसलेल्या व्यक्तीला वारा घाला. कपडा व्यक्तिच्या जवळून नेताना विजेच्या ठिणग्या
पडलेल्या दिसतील. हा प्रयोग अंधारात केल्यास ठिणग्या स्पष्ट दिसतील. कधी कधी
ठिणग्यांचा झटका बसतो, सावधपणे
प्रयेग करा.कृत्रिम धाग्याच्या कपड्याच्या हालचालीने स्थिरविद्युत निर्माण होते.
तिच्या प्रभावाने प्लॅस्टिकमध्ये प्रवर्तीत वीज तयार होते. दोन्ही विरूद्ध
भाराच्या वीजा निर्भारीत होताना ठिणग्या पडतात.
५. अंगात वीज.
साहित्य – तुम्ही स्वत:
कृती – तुमचा एक हात – डावखोर्यांनी उजवा आणि
उजखोर्यांनी डावा – सरळ जमिनी
समांतर ताणा. तो हात कोपर्यात दुमडा. दुसर्या हाताच्या मधल्या बोटाने कोपर्याच्या
हाडाच्या टोकावर हलका झटका द्या. तुम्हाला विजेचा झटका बसलेला जाणवेल. यावरून
तुमच्या अंगात वीज आहे हे सिद्ध होईल.
हाताच्या
कोपर्याच्या हाडांजवळील – अलनर नस त्वचेच्या बरीच जवळ असते. नसांचे कार्य
विजेच्या सूक्ष्म प्रवाहावर अवलंबून असते. आपल्या शरीरात पेशीत पोटॅशियम जास्त तर
रक्तात सोडीयम जास्त असतो. त्यांच्यात विशिष्ट परिस्थितीत वीजभार निर्माण होतो.
6. सूर्यावरचे डाग घरात पहा
साहित्य – आरसा, कागद, कात्री, पट्टी, पेन्सिल, कंपास.
कृती – एका ए4 आकाराच्या कागदावर मध्यभागी एक सेंटिमीटर
त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ कात्रीच्या सहाय्याने कापून घ्या. तो कागद एका
आरशावर चिकटवा. आरसा घराबाहेर उन्हात ठेवा. वर्तुळाकार भोकातून येणारा कवडसा
भिंतीवर पडू द्या. आरसा भितीपासून दूर असेल तेवढा कवडसा मोठा पडेल. कवडसा वगळता
बाकी येणारे उजेड कमीतकमी करा. कवडशामध्ये काही काळसर ठिपके दिसतील ते सूर्यावरचे
डाग आहेत. कवडशात ढगही हालताना दिसतील. आरशावरून परावर्तित झालेला सूर्यप्रकाश कमी
प्रखर होतो, तो भिंतीवर पडून परावर्तीत होताना त्याची
प्रखरता आणखी कमी होते आणि बारकावे दिसायला लागतात.
7. संत्र्याची आतषबाजी
साहित्य – मेणबत्ती, काड्यापेटी, संत्री
कृती – संत्र्याची साल सोला. आतल्या फोडी खाऊ शकता. एक मेणबत्ती काड्यापेटीने पेटवा.
तिची ज्योत स्थिर राहू द्या. संत्र्याच्या सालीचा एक तुकडा अंगठा आणि मधले बोट
यांच्या पकडीत धरा. मेणबत्तीच्या ज्योतीजवळ नेऊन साल उभ्यात दाबा. सालीतून उडालेले
शितोंडे प्रखर उजेड पाडत पेटतील.संत्र्याच्या सालात ज्वालाग्राही तेल असते.
दाबल्यावर त्याचे तुषार उडतात. मेणबत्तीच्या ज्योतिमुळे पेटतात व संपून विझतात.
8. मऊ काजू करा टणक
साहित्य – मऊ पडलेले काजू, बदाम, पिस्ते, फ्रिज
कृती – मऊ पडलेले काजू, बदाम, पिस्ते वगैरे
तेलबिया खायला मजा येत नाही. ते पूर्ववत कडक करण्यासाठी मऊ सुकामेवा एका बशीत
पसरून ठेवा. ती बशी फ्रिजच्या आत ठेवा. काही तासांनी बशी बाहेर काढून पहा सुकामेवा
पुन्हा टणक झालेला असेल.पाणी आत शिरल्याने सुकामेवा मऊ होतो. फ्रिजमध्ये हवा गार
आणि कोरडी असते. कोरड्या हवेमुऴे सुक्यामेव्यातला दमटपणा बाहेर फेकला जातो.
9. आम्लतादर्शक पट्टी
साहित्य – साधा वहीचा कागद, सदाफुलीची फुले, कात्री, लिंबू, सोडा.
कृती – साधा – गुळगुळीत
नसलेला – वहीचा कागद
घ्या. कागदावर शाई फुटत असेल तर तो या प्रयोगासाठी उत्तम कागद. सदाफुलीच्या
फुलाच्या पाकळ्या कागदावर चोळून कागद रंगीत करा. कागद ओलसर झाला तरी चालेल. कागद
कडक होईपर्यंत वाळवा. यातला एक तुकडा घेऊन त्यावर लिंबाच्या रसाचा थेंब टाका.
कोणता रंग येतो? अशाच दुसर्या तुकड्यावर ओलसर करून सोड्याची
चिमूट टाका. कोणता रंग येतो पहा. दोन रंग वेगळे आले की आपली आम्लतादर्शक पट्टी
तयार झाली. न झाल्यास आणखी पाकळ्या चोळून कागद वाळवा. कात्रीने कागदाच्या अर्धा
सेंटिमीटर रुंदीच्या पट्ट्या करा.सदाफुलीच्या पाकळीतील रंगद्रव्य आम्लतेनुसार रंग
बदलते.
10. हैड्रोजन क्लोराईड वायू बनवा.
साहित्य – मीठ, खाण्याचा सोडा, छोटा खलबत्ता, चमचा, आम्लतादर्शक
पट्टी, अमोनिया.
कृती – छोट्या खलबत्त्यात एक चमचा कोरडे मीठ घाला, तसेच चमचाभर खाण्याचा सोडा घाला. बत्त्याने
हे मिश्रण खलत रहा. आंबूस वास येईल. त्यावेळी ओलसर आम्लतादर्शक पट्टी खलाजवळ आणा
तिचा रंग बदलेल. अमोनियाच्या द्रावणाचा एक थेंब चमच्यावर घ्या. तो खलाजवळ आणल्यास
त्यातून नवसागराचा पांढरा धूर आलेला दिसेल.मीठ आणि खाण्याचा सोडा कोरड्यातच खलला
की त्यातून हैड्रोजन क्लोराईड वायू मुक्त होतो व खलात धुण्याचा सोडा तयार होतो.
अमोनियाच्या द्रावणातून बाहेर पडणारा अमोनिया वायू हैड्रोजन क्लोराईड वायू बरोबर
संयोग पावून नवसागर धूर स्वरूपात तयार होतो.
११. सात वीत का आठ
वीत?
साहित्य – अनेक व्यक्ती, फूटपट्टी, भिंत, पेन्सिल
कृती – एका भिंतीवर पट्टी आणि पेन्सिलीच्या
सहाय्याने उंची मोजण्यासाठी उपयोगी पडतील अशा खुणा करा. एका व्यक्तिला तेथे उभे
करून तिची उंची मोजा. त्याच व्यक्तिला फूटपट्टीवर हात ठेवून तो ताणयला सांगा.
करंगळीच्या टोकापासून ते अंगठ्याच्या टोकापर्यंतचे अंतर मोजा. ते एक वीत झाले.
त्यावरून ती व्यक्ती तिच्या किती वीत उंच आहे ते पहा. सात वीत का आठ वीत?वय वाढते तसे उंची किती वीत हे प्रमाण कसे
बदलते ते तपासा.
12. मुद्दाम उमलवलेले फूल
साहित्य – दोन कळ्या, तुमची फुंकर
कृती – एकाच झाडाच्या दोन सारख्या आकाराच्या टपोर्या
न उमललेल्या कळ्या निवडा. त्यापैकी एक कळी खुडून हातात घ्या. झाडावरची कळी
निसर्गात वार्याच्या मदतीने उमलते तशी तुमच्या हातातली कळी फुंकरीने हळुहळू
उमलवा. फुंकरून उमलवलेला कळी आणि निसर्गात उमललेली कळी यांच्या आकारात काही फरक
दिसतो का ते पहा. पाकळ्यांच्या रचनेत काही फरक पडतो का ते पहा. फुलाच्या
टिकावूपणात काही फरक पडतो का ते पहा.उमलवलेल्या फुलापेक्षा उमललेलं फूल अधिक मोठं, टवटवीत दिसतं आणि दीर्घ काळ टिकतं.
13. आपोआप उमलणारे कागदी फूल
साहित्य – वृत्तपत्राचा
कागद, ब्लेड अगर कात्री, नाणे, ताटली, पाणी
कृती – एक वृत्तपत्राचा कागद घ्या. कात्री वापरून तुमच्या पंजाएवढे कागदाचे वर्तुळ
कापून घ्या. कागदाच्या मध्यभागी नाणे ठेवा. नाण्यापासून निघणार्या समान
अंतरावरच्या सहा त्रिज्यांना ब्लेडने काप द्या. नाणे काढून घ्या. या सहा पाकळ्या
आत दुमडून कळीचा आकार द्या. एका ताटलीत चार थेंब पाणी घ्या. कळी केलेला कागद
त्यावर उभा ठेवा. कागद ओला होत जाईल तसतश्या पाकळ्या उमलताना दिसतील.कागदाचे
वाकवलेले तंतू पाण्यामुळे लांबतात त्यामुळे पाकळी उमलताना दिसते.
14. फुग्यात हवा किती?
साहित्य – फुगा, दोरी, पट्टी
कृती – एक गोलाकार फुगा घ्या. तो पूर्ण फुगवा. त्याचे तोंड दोरीने बांधा. उन्हात एका
सपाट पृष्ठभागावर फुगा काळजीपूर्वक ठेवा. त्याच्या सावलीच्या परिघाच्या कडेकडेने
दोरीचे वर्तुळ पटकन् तयार करा. वर्तुळ पूर्ण झाल्यावर तेवढा दोरा काढून घ्या. दोर्याची
लांबी मोजा. परिघाच्या लांबीवरून (२ x पाय
x त्रिज्या)
गणित करून फुग्याची त्रिज्या मिळवा. त्रिज्येवरून गोलाकार फुग्याचे घनफळ काढा.(4/3 X पाय
X त्रिज्या3.). हेच फुग्यातल्या हवेचे आकारमान.
15. भिंतीवर सप्तरंग
साहित्य – पसरट पातेले किंवा परात, पाणी, छोटा आरसा
कृती – घराबाहेर उन्हात एक पसरट पातेले किंवा परात ठेवा. त्याच्या आत एक छोटा आरसा
ठेवा. आरशातून परावर्तित झालेल्या उन्हाचा कवडसा घरात भिंतावर पडेल अशा पद्धतीने
आरशाची जागा पक्की करा. पसरट पातेल्यात हळुहळू पाणी घालून पातेले पाण्याने पूर्ण
भरा. घरात पडलेला कवडसा इंद्रधनुष्यासारखा सप्तरंगी झालेला दिसेल.
सूर्यप्रकाश
अनेक रंगछटांचा बनलेला असतो. पाण्यात शिरताना प्रत्येक रंगछटेच्या किरणाची दिशा
वेगवेगळ्या प्रमाणात बदलते. आरशावरून परावर्तीत झाल्यानंतर पुन्हा पाण्याबाहेर
पडताना प्रत्येक रंगछटेच्या किरणाची दिशा वेगवेगळ्या प्रमाणात आणखी थोडी बदलते. त्यामुळे रंगछटा अलग
झालेल्या दिसतात.
16. झाडाची उंची मोजणे प्रकार 1
साहित्य – झाड, मोबाईल, एक व्यक्ती, मोजपट्टी.
कृती – एक व्यक्ती निवडा. तिची उंची मोजा (उ). ज्या झाडाची उंची मोजायची आहे
त्याच्याशेजीरी तिला उभे करा. फोटो काढता येणारा मोबाईल घ्या. फोटोच्या चौकटीत ते
झाड आणि ती व्यक्ती पूर्ण मावेल असा फोटो घ्या. व्यक्तीची फोटोतली उंची मोजा (फ१).
या उंचीने व्यक्तीच्या उंचीला भागून (उ/फ१) येणारी पट (प) काढा. फोटोतील झाडाची
उंची मोजा (फ२). या उंचीला पटीने गुणा (फ२ गुणिले प). झाडाची उंची मिळेल. फोटोत सर्व वस्तूंच्या प्रतिमा एकाच पटीत
बदलतात.
17. झाडाची उंची मोजणे प्रकार 2
साहित्य – १ मीटर लांबीची पट्टी, मोजपट्टी किंवा टेप, झाड.
कृती – हा प्रयोग लख्ख ऊन असेल तेव्हा करावा. सूर्योदयानंतर किंवा सूर्यास्ताच्या
आधीच्या लगत केल्यास अधिक अचूक उत्तर मिळेल. १ मीटर लांबाची पट्टी उन्हात
झाडाशेजारी उभी ठेवा. पट्टीची सावली मोजा, झाडाची सावली
मोजा. झाडाच्या सावलीला पट्टीच्या सावलीने भागा. भागाकाराचे उत्तर म्हणजे झाडाच्या
सावलीइतके येईल.दोन उभ्या वस्तू आणि त्यांच्या सावल्या या दोन एकरूप त्रिकोणांच्या
बाजू असल्यामुळे त्यांच्या लांबीचे गुणोत्तर समान असते.
18. झाडाची उंची मोजणे प्रकार 3
साहित्य – दोन सारख्या लांबीच्या पट्ट्या, गोंद, झाड.
कृती – हा प्रयोग एका दिवसात विशिष्ठ दोन वेळाच करता येतो. दोन सारख्या लांबीच्या
पट्ट्या घ्या. त्या एका टोकाशी एकमेकींना काटकोनात राहातील अशा प्रकारे गोंदाने
पक्क्या चिकटवा. ज्या झाडाची उंची मोजायची आहे त्याच्या शेजारी उन्हात हा काटकोनी
जोड उभा ठेवा. आडवी पट्टी सूर्याच्या विरूद्ध बाजूला ठेवा. उभ्या पट्टीच्या टोकाची
सावली आडव्या पट्टीच्या टोकावर पडली की झाडाच्या सावलीची लांबी मोजा. ती झाडाच्या
उंची एवढीच असते.सूर्य ४५ अंशावर आला की समद्विभूज काटकोन बनतो, त्यात उभी बाजू आडव्या बाजूइतकी असते.
19. झाडाची उंची मोजणे प्रकार 4
साहित्य – झाड, गॅसचा भरलेला
फुगा, लांब दोरा, स्केच पेन, मोजपट्टी.
कृती – हा प्रयोग वारा पडलेला असेल तेव्हा करता येतो. एक गॅसचा भरलेला फुगा घ्या.
त्याच्या टोकाला भरपूर लांबी असलेला दोरा जोडा. झाडाखाली उभे राहून गॅसचा फुगा
हळुहळू उभा सोडा. तो झाडाच्या शेंड्यापर्यंत पोचू द्या. फुग्याला जोडलेल्या उभ्या
दोर्याचा जो भाग जमिनीला टेकला असेल त्यावर स्केच पेनने खूण करा. फुगा हळुहळू
खाली घ्या. त्या खुणेपासून फुग्याच्या शेंड्यापर्यंतचे अंतर पट्टीने मोजा. ते
झाडाच्या उंचीएवढे असते.गॅसचा फुगा हवेच्या उद्धरणशक्तीमुळे वारा नसेल तर सरळ वर
जातो.
20. झाडाची उंची मोजणे प्रकार 5
साहित्य – एक छोटी काठी, विजेरी किंवा टॉर्च, दोरी, कोनमापक, मोजपट्टी, टॅन कोष्टक.
कृती – हा प्रयोग अंधारात करावा. एका काठीच्या टोकाला दोराच्या सहाय्याने एक विजेरी
किंवा टॉर्च पक्का बांधा. झाडापासून दहा मीटर अंतरावर एक खूण करा. या खुणेवर
विजेरी बांधलेल्या काठीचे दुसरे टोक ठेवा. विजेरीचा झोत झाडाच्या शेंड्यावर पडेल
अशा प्रकारे काठी तिरपी ठेवा. काठीने जमिनीशी केलेला कोन मोजा. त्या कोनाच्या
टॅनची किंमत टॅन कोष्टकात पहा. या किंमताला दहाने गुणल्यावर झाडाची उंची
समजेल.एखाद्या कोनाची टॅन म्हणजे काटकोन त्रिकोणातील त्या कोनासमोरची बाजू (येथे
झाडाची उंची) भागिले लगतची बाजू (येथे झाडापासूनचे अंतर, १० मीटर) यांचे गुणोत्तर.
21. दोन डोळे किती शेजारी?
साहित्य – प्लॅस्टिकची पट्टी, स्केचपेन, चिकटपट्टी.
कृती – या प्रयोगासाठी एक मदतनीस लागेल. एक चांगली पारदर्शक प्लॅस्टिकची पट्टी घ्या.
तिचा मध्यभाग मदतनीस व्यक्तिच्या नाकावर ठेवा. एक चिकटपट्टीच्या कपाळ आणि
प्लॅस्टिकपट्टी यांना मिळून चिकटवा. त्या व्यक्तिला स्थिर बसायला तसेच लांबवर
बघायला सांगा. नजर हलता कामा नये. एक स्केच पेन घेऊन त्या व्यक्तिच्या डोळ्याच्या
बाहुल्या पट्टीतून दिसतील तेथे स्केचपेनने ठिपके द्या. दोन ठिपक्यांमधले अंतर
मोजा.दूर अंतरावर बघत असताना दोन डोळ्यांमध्ये सुमारे सहा सेंटीमीटर अंतर असते.
22. तहानलेला कावळा.
साहित्य – तांब्या, पाणी, गोट्या किंवा
खडे.
कृती –तहानलेला
कावळा ही गोष्ट प्रयोग करून तपासायची आहे. एका तांब्यात तळाशी गोष्टीतल्या इतके
पाणी घ्या. त्यात एक गोटी किंवा कावळ्याच्या चोचीत मावेल इतक्या आकाराचा खडा टाका.
पाण्याची पातळी थोडी वाढेल. असे एक एक करत आणखी खडे किंवा गोट्या टाका. पाण्याची
पातळी पूर्ण वर येण्यासाठी लागणार्या गोट्या किंवा खड्यांची संख्या, खेपा, वेळ यांची
आकडेवारी तपासून पहा. तहानलेला कावळा ही गोष्ट सिद्ध होण्यासाठी आधीची पाण्याची
पातळी किती असावी तेही तपासा.दगडावर दगड टाकले की दगडांमध्ये किती तरी मोकळी जागा
राहाते त्यात पाणी भरल्याशिवाय ते वर येऊ शकत नाही.
23. खडू फुंकरा बाटलीत.
साहित्य – लहान तोंडाची बाटली, खडूचा तुकडा.
कृती – एक लहान तोंडाची बाटली घ्या. टेबलवार आडवी ठेवा. बाटलीच्या तोंडापेक्षा लहान
आकाराचा खडूचा तुकडा घ्या. तो बाटलीच्या तोंडात ठेवा. फुंकर मारून तो तुकडा बाटलीत
ढकलायचा आहे. विविध प्रकारे फुंकर मारून खडूचा तुकडा बाटलीत ढकलायचा प्रयत्न करा.
कितीतरी प्रयत्न केले तरी तुकडा बाहेर फेकला जातो.फुंकर मारताना बाटलीत कोंडल्या
गेलेल्या हवेचा दाब वाढतो आणि ती जोराने बाहेर येते, येताना खडूचा तुकडा बाहेर ढकलते.
24. मध्याकडेच जाणार.
साहित्य – पाणी, पाण्याचा मग, वाटी, प्लॅस्टिकचे
झाकण
कृती – एका मगमध्ये पाणी भरून घ्या. छोट्या प्लॅस्टिकच्या बाटलीचे झाकण घ्या. ते उलटे
धरून हलकेच मगमधल्या पाण्याच्या मध्यभागी ठेवा. झाकण कडेकडे सरकते. आता एका वाटीत
पाणी घेऊन मगमध्ये थोडे थोडे टाका. पाण्याची पातळी मगच्या कडेच्या वर जाईल तसे
कडेला गेलेले झाकण मध्याकडे सरकताना दिसेल.
मगच्या
पातळीच्या वर असलेल्या पाण्यातील कणांची ओढ त्यांना एकमेकांजवळ आणते, त्याबरोबर झाकणही मध्याकडे ढकलले जाते.
25. ऐकण्याचा नकाशा काढा.
साहित्य – एक व्यक्ती, फोन, मोबाईल, कापूस, रुमाल, कागद, पेन.
कृती – एका व्यक्तिला एका खोलीत फोन शेजारी बसवा. एक मोबाईल घेऊन फोनवरून तो डायल
करायला सांगा. तो आवाज लक्षात ठेवायला सांगा. बसलेल्या व्यक्तीच्या एका कानात
कापसाचा बोळा बसवा तसेच रुमाल बांधून तिचे डोळे झाका. एका कागदावर खोलीचा नकाशा
काढा. नकाशात व्यक्तीचे स्थान दाखवा. मोबाईलला रिंग केल्यावर जिथून आवाज येतो
तिकडे बोटाने दाखवायला सांगा. व्यक्तीने दाखवलेल्या दिशेला रेघ ओढा टोकाला (१) अंक
लिहा तसेच प्रत्यक्ष मोबाईलच्या जागी नकाशात (1) लिहा. असे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून करा.
प्रत्यक्ष जागा आणि दाखवलेली जागा यातला फरक पहा. दुसरा कान बंद करून हाच प्रयोग
करा. ऐकण्याचा नकाशा मिळेल.
आपल्याला
नेमकी दिशा लक्षात येण्यासाठी दोन्ही कानांमध्ये ऐकू येणार्या आवाजात फरक असतो.
26. भिंगरीवरचे रंग.
साहित्य – भिंगरी, वेगवेगळ्या
रंगांचे कागद, कात्री, गोंद.
कृती –एक भिंगरी
घ्या. भिंगरीच्या आकारात मावतील अशा वर्तुळाकारात प्रत्येक रंगाचा कागद कापून घ्या, प्रत्येक वर्तुळाकार कागदाच्या समान सहा
पाकळ्या करा. सहा रंगांच्या प्रत्येकी एक अशा सहा पाकळ्या भिंगरीच्या वरच्या बाजूला
गोंदाने डकवा. भिंगरी वेगात फिरवा. सहा रंगांची मिळून दिसणारी रंगछटा पहा.
अनेक
रंगांच्या एकत्रिकरणाने मिळणारी रंगछटा सहात नसलेल्या छटेच्या पूरक रंगाची असते.
27. गूळ नाही साखर नाही पाणी मात्र गोड.
साहित्य – पाणी, तुरट आवळा, पेला.
कृती – एका पेल्यात पाणी घ्या. एक घोट पाणी प्या. पाण्याची चव लक्षात ठेवा. पाण्यात
गूळ, साखर किंवा अन्य कोणताही गोड पदार्थ घालू
नका. तुरट आवळ्याचा एक तुकडा चावून चावून खा. आता एक घोट पाणी तोंडात घ्या. पाणी
गोड लागेल.
आवळ्याच्या
तुरट चवीमुळे जीभेवरच्या चव ग्रंथी काही प्रमाणात बधीर होतात. त्या वेळी
पाण्यांच्या रेणूंचा स्पर्श झाला की मेंदूत त्याचा अर्थ गोड असा लावला जातो.
28. स्वेटर गरम करतो गार राखतो.
साहित्य – तुम्ही, स्वेटर, बर्फ, घड्याळ.
कृती – एक स्वेटर घ्या. अंगात घाला. घड्याळात वेळ बघा. तुमच्या शरीराला हळुहळू उबदार
वाटू लागेल. काही वेळाने घाम आल्याचे जाणवेल. पुन्हा घड्याळात बघा. किती वेळ लागला
त्याची नोंद घ्या. स्वेटर अंगातून काढा. बर्फाचा एक घट्ट गोळा करून घ्या. बर्फाला
स्वेटर घाला. तुम्हाला घाम फुटायला लागला तितका वेळ तो ठेवा. मग स्वेटर काढा. गरम
होऊन बर्फ वितळला का तपासा.स्वेटर उष्णतारोधक पदार्थाचा बनवलेला असतो. उष्णतेचे
वहन होण्यात त्याचा अडथळा येतो.
29. कडेकडेच जाणार.
साहित्य – पाणी, पाण्याचा मग, प्लॅस्टिकचे झाकण
कृती – एका मगमध्ये पाणी भरून घ्या. छोट्या प्लॅस्टिकच्या बाटलीचे झाकण घ्या. ते उलटे
धरून हलकेच मगमधल्या पाण्याच्या मध्यभागी ठेवा. झाकण कडेकडे सरकते. कितीही वेळा
करून खात्री करून घ्या. पाण्याच्या मग ऐवजी त्यापेक्षा मोठ्या तोंडाचे भांडे घेऊन
काय फरक पडतो, ते पहा.
पाण्याच्या
कणांमध्ये एकमेकांशी असलेल्या ओढीच्या जोरापेक्षा पाण्याच्या कणांना मगच्या कणांशी
ओढीचा जोर जास्त असतो. त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागाची ओढ झाकणाला कडेकडे ढकलते.
30. मिठातून उजेड .
साहित्य – जाड मीठ, पाणी, काचेचा पेला.
कृती – हा प्रयोग पूर्ण अंधारात करायला हवा. एक काचेचा पेला घ्या. त्यात पाणी भरा.
हातात मीठाचे खडे घ्या. पूर्ण अंधार करा. मिठाचा एक खडा पाण्यात टाका. खडा विरघळत
जाईल तसतसा अतिशय मंद हिरवट उजेड पडलेला दिसेल.निसर्गत: मिठाचे स्फटिक बनत असताना
त्यात कुठे कुठे आयनांची रचना अपुरी राहीलेली असते. मीठ विरघळताना तेथे अडकलेले
मुक्त आयन पाण्याच्या संपर्कात येतात. आयनांची रासायनिक क्रिया होते त्यावेळी उजेड
रुपात ऊर्जा बाहेर पडते.
31. काळवंडणारा रंग.
साहित्य – रंगीत छपाई असलेला कागद, विविध रंगांचे जिलेटीनचे कागद..
कृती – एक रंगीत छपाई असलेला कागद घ्या. त्यातल्या वेगवेगळ्या रंगांच्या छटा नीट बघून
घ्या. कोणत्या तरी एका रंगाचा जिलेटीनच्या कागदाचा तुकडा घ्या. तो तुमच्या डोळ्यांसमोर धरा. रंगीत छपाई
असलेल्या कागदावरचे रंग बघा. कोणता रंग काळा किंवा गडद करडा दिसतो ते बघा. तो रंग
आणि जिलेटीनचा रंग यांना पूरक रंग म्हणतातहिरवी शाई लाल रंग शोषून घेते आणि बाकी
सगळे रंग परावर्तित करते त्याचा परिणाम म्हणून तो भाग हिरवा दिसतो. लाल जिलेटीन
हिरवा प्रकाश शोषून घेतो त्यामुळे हिरवा भाग अप्रकाशित किंवा काळा दिसतो.
32. एका कानाने ध्वनीवेध.
साहित्य – फोन, मोबाईल, कापूस, रुमाल.
कृती – एका व्यक्तिला एका खोलीत फोन शेजारी बसवा. एक मोबाईल घेऊन फोनवरून तो डायल
करायला सांगा. तो आवाज लक्षात ठेवायला सांगा. बसलेल्या व्यक्तीच्या एका कानात
कापसाचा बोळा बसवा तसेच रुमाल बांधून तिचे डोळे झाका. मोबाईलला रिंग केल्यावर
जिथून आवाज येतो तिकडे बोटाने दाखवायला सांगा. असे मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून
करा. एका कानाने ऐकून नेमकी दिशा सांगायला कठीण जाते.आपल्या दोन्ही कानांमध्ये ऐकू
येणार्या आवाजात फरक पडतो त्यामुळे आपल्याला नेमकी दिशा लक्षात येते.
33. गरम फुंकर गार फुंकर.
साहित्य – स्वत:
कृती – एका हाताची मागची बाजू तोंडासमोर न्या. गाल फुगवा. ओठात छोटीशी फट ठेवून
हातावर फुंकर मारा. फुंकरीमुळे गार वाटते. आता ओठाची फट थोडी मोठी करून फुंकर
मारा. फुंकरीचा गारवा कमी होईल. तोंड जास्तीत जास्त उघडे ठेवून हाss असा आवाज करत फुंकर मारा. ही गरम फुंकर.फुंकर
मारताना तोंडातली जास्त दाबाची हवा वेगाने बाहेर येताना थंड होते. तोंड पूर्ण
उघडून मारलेल्या फुंकरीचे तापमान शरीराच्या आतल्या भागाइतके असते.
34. गरम फुंकर बसवते झाकण पक्के.
साहित्य – स्टीलचा पेला, प्लॅस्टिकचे झाकण.
कृती – एक स्टीलचा पेला घ्या. पेल्याच्या तोंडापेक्षा मोठ्या आकाराचे प्लॅस्टिकचे
हलके झाकण घ्या. डाव्या हातात पेला उलटा धरा. त्याच्या तोंडाखाली झाकण ठेवून ते
उजव्या हाताच्या मधल्या बोटाने हलके दाबा. बोट काढा. झाकण खाली पडते. आता पेल्यात
गरम फुंकर पटकन पेला उलटा धरा. त्याच्या तोंडाखाली झाकण ठेवून ते उजव्या हाताच्या
मधल्या बोटाने हलके दाबा. बोट काढा. झाकण पेल्याला चिकटून राहाते.गरम फुंकरीमुळे
पेल्यातील हवा विरळ होते, झाकण लावून गार झाल्यावर तिचा दाब कमी होतो.
बाहेरच्या हवेच्या दाबामुळे झाकण पक्के बसते.
करून पहा साधे सोपे प्रयोग भाग-4
1.रूपयाभर पाणी
साहित्य – एक रूपयाचे नाणे, पेलाभर पाणी, ड्रॉपर
कृती – एक रूपयाचे नाणे सपाट पृष्ठभागावर ठेवा. शाई भरण्याच्या स्वच्छ ड्रॉपरमध्ये
पाणी भरा. त्यातून एक थेंब पाणी नाण्याच्या मध्यावर टाका. त्याच्यावर आणखी थेंब
पाणी टाका. नाण्यावरून न सांडता किती थेंब पाणी नाण्यावर साचेल याचा अंदाज करा.
बहुधा तुमच्या अंदाजापेक्षा किती तरी अधिक पाणी नाण्यावर सामावेल.पाण्याच्या
थेंबामध्ये परस्परांना जोडून घेण्याचा जोर असतो, तो गुरुत्त्वाकर्षणापेक्षा कमी झाला की पाणी
ओसंडून वाहते.
2. एकापेक्षा दोन हलके?
साहित्य – दोन सारख्या आकाराच्या उभट डब्या – झाकणासह, वाळू, एक व्यक्ती
कृती – पूर्वतयारी – दोन डब्या घ्या. एका डबीत जास्तीत जास्त वाळू भरा. झाकण लावा.
आता प्रयोगाला सुरूवात करा. एका व्यक्तीला तळहात पुढे करून उभे करा. त्या तळहातावर
भरलेली डबी ठेवा. हातावर पडलेला भार अनुभवायला सांगा. दुसरी डबी पहिल्या डबीवर
ठेवा. समोरच्या व्यक्तिला दोन्ही डब्या एकमेकींवर ठेवल्यावर भार कमी जाणवतो.दुसरी
डबी ठेवली जात असताना तळहाताचे स्नायू दुप्पट भार सहन करण्याची तयारी करतात पण भार
फार वाढत नाही त्यामुळे तो कमी झाल्यासारखा वाटतो.
3. वस्तूला दूध पाजा.
साहित्य – विविध प्रकारच्या वस्तू, दूध, चमचा, लाकडी फळी, फडके.
कृती – एक लाकडी फळी घ्या. फळीवर स्वच्छ फडके नीट पसरा. फडक्यावर एक वस्तू स्थर राहील
अशी ठेवा. एका चमच्यात चमचाभर दूध घ्या. चमच्याची कड वस्तूच्या पृष्ठभागाला टेकवा.
चमचा किंचित तिरपा करा. चमच्यातले दूध हळुहळू कमी होताना दिसेल. दुधाचा पातळ थर
वस्तूवरून सरकताना दिसला नाही तरी फडके दूधाने ओले झालेले दिसेल.दूधाच्या
पृष्ठभागावरून थोडेसे दूध वस्तूच्या पृष्ठभागावर आले की त्यातल्या पाण्याच्या कणांच्या
ओढीने चमच्यातील दूध ओढले जाते.
4. कोणता डोळा लाडका?
साहित्य – ३० मीटर पलिकडची वस्तू, तुम्ही स्वत:
कृती – एका मोकळ्या जागेसमोर उभे रहा. ३० मीटर पलिकडची एक वस्तू निवडा. दोन्ही डोळे
उघडे ठेवून त्या वस्तूकडे बोट दाखवा. स्थिर रहा. आधी डावा डोळा बंद करून बघा. तो
उघडा. मग उजवा डोळा बंद करून बघा. कोणत्या डोळ्याने बघताना बोट आणि वस्तू एका
रेषेत दिसते? तो तुमचा लाडका डोळा.प्रत्येक व्यक्तिची एक
बाजू दुसरीपेक्षा सक्षम असते. काही डावखोरे असतात काही उजखोरे. तसेच डोळ्याच्या
बाबतीत होते.
5. चष्मेवाल्यांना जग कसे दिसते?
साहित्य – बहिर्गोल भिग, चष्मा.
कृती – दार खिडक्यांच्या विरूद्ध बाजूला असलेल्या भिंतीवरची अंधारी जागा निवडा. एक
बहिर्गोल भिंग त्या जागेसमोर उभे धरा. ते पुढे मागे करत भिंतीवर समोरच्या दार
खिडकीची स्पष्ट प्रतिमा मिळवा. ती उलटी दिसेल. आता भिंगाच्या पुढे चष्म्यातले एक
भिंग धरा. प्रतिमा धूसर होईल. दोन्ही भिंगात तेवढेच अंतर राखत दोन्ही भिंगे
पुढेमागे करत भिंतीवर स्पष्ट प्रतिमा मिळवा. आता फक्त चष्मा काढून घ्या. भिंतीवर
पडलेली धूसर प्रतिमा दिसते तसे जग त्या चष्मेवाल्याला दिसते.डोळ्याच्या भिंगाने
प्रतिमा धूसर दिसते म्हणून चष्म्याचा आधार घ्यावा लागतो.
6. गव्हांकुराची वाढ.
साहित्य – चौकोनी ट्रे, माती, पाणी, रांगोळी, गहू, गव्हाची
चाळणी.
कृती – साधी माती गव्हाच्या चाळणीने चाळून घ्या. ट्रे मध्ये तिचा थर एक-दिड सेंटीमीटर
व्हायला पाहीजे. मातीवर पाणी शिंपडा. रांगोळीने दर २ सेंटीमीटर अंतरावर अधिकची खूण
करा. त्यांनी बनवलेल्या कोपर्यातल्या चौरसात दोन गहू पेरा. पुढे दर ४ तासांनी
एकेका चौरसात दोन गहू पेरा, थोडे पाणीही
शिंपडा. शेवटच्या चौरसात पेरलेल्या गव्हाला मोड आल्यावर प्रत्येक गव्हांकुराची
उंची मोजा.ती वेळेनुसार वाढली आहे का?
7. साखरेतून उजेड .
साहित्य – जाड साखर, फरशी, बत्ता
कृती – हा प्रयोग पूर्ण अंधारात करायला हवा. एक गुळगुळीत फरशी घ्या. ओटा किंवा दगडी
पोळपाट चालेल. त्याच्यावर थोडी साखर पसरा. हातात बत्ता घ्या. पूर्ण अंधार करा.
बत्त्याने दाबत साखर चुरडा. चुरडताना निळसर उजेड पडलेला दिसेल.साखरेचे स्फटिक बनत
असताना त्यात कुठे कुठे आयन अडकून पडलेले असतात. साखर चुरडताना ते हवेशी संपर्कात
येतात. त्यांची रासायनिक क्रिया होते त्यावेळी उजेड रुपात ऊर्जा बाहेर पडते.
8. दुरून पेटणारी मेणबत्ती
साहित्य – मेणबत्ती, काड्यापेटी.
कृती – एक मेणबत्ती घ्या. स्टॅंडवर किंवा बशीत किंवा पक्क्या आधारावर ठेवा.
काड्यापेटीने मेणबत्ती पेटवा. तिची ज्योत चांगली स्थिर होऊ द्या. मेणबत्ती एकाच
फुंकरीत पटकन् विझवा. मेणबत्तीच्या विझलेल्या ज्येतीतून एक धुराची रेषा वर गेलेली
दिसेल. ती रेषा अखंड असतानाच एक काडी पेटवून धुराच्या रेषेच्या टोकाला लावा. एक
बारीक ज्योत मेणबत्तीच्या वातीपर्यंत जाताना दिसेल. मेणबत्ती पुन्हा प्रज्वलीत
होईल. धुराची रेषा अखंड नसेल तर तसे होणार नाही.मेणाचा धूर किंवा कोणतीही गोष्ट
पेटण्यासाठी तिचे तापमान पेट घेण्यालायक असायला लागते शिवाय एक ज्योत किंवा ठिणगी
तरी लागते.
9. कागदी पट्टीचा झुकता पूल
साहित्य – कागद, कात्री, पट्टी, डिंक, पुठ्ठा
कृती – कागदाची १५ सेंटीमाटर लांब आणि २ सेंटीमीटर रुंद आकाराची पट्टी कापून घ्या.
दोन्ही टोकांपासून एक सेंटीमीटर अंतरावर पट्टी दुमडून घ्या. दुमडलेल्या भागांना
एका बाजूने डिंक लावून ती टोके पुठ्ठ्यावर चिकटवा. त्याच्यातील अंतर ७ ते ८
सेंटीमीटर राहील असे पहा. कागदाच्या या कमानीखालून लांब फुंकर मारा. कमान वर न
जाता खाली जाते.फुंकरीमुळे कमानीखाली हवेचा दाब कमी होतो व ती ढकलली जाते.
10. पांढरा बगळा होई काळा
साहित्य – ५ सेंटीमीटर लांबीचा कागदी चौरस, पेन्सिल, ब्रश, काळा रंग इ.
कृती – ५ सेंटीमीटर
लांबीचा एक कागदी चौरस घ्या. त्याच्यावर पेन्सिलीने बगळ्याची रेखाकृती काढा. डोळा
काळा रंगवा. बगळा सोडून बाकी पूर्ण कागद काळ्या रंगाने रंगवा. बगळ्याच्या डोळ्याकडे
एक मिनिट एकटक पहा. मग तुमची नजर एखाद्या सपाट एकरंगी भिंतीवर न्या. तुम्हाला
बगळ्याची रेखाकृती काळी दिसेल.आपल्या डोळ्याच्या पटलावर झालेल्या पांढर्या
रंगाच्या प्रभावामुळे नंतर तो भाग कमी प्रकाश पाहतो म्हणून तो भाग काळा
झाल्यासारखा वाटतो.
11. रंग वाचता येतात की शब्द?
साहित्य – कोरा कागद, पेन्सिल, रंगीत खडू किंवा ब्रश – रंग
कृती – एक कोरा कागद घ्या. त्यावर पेन्सिलिने मोठ्या
पुसट अक्षरात तुम्हाला माहिती असलेल्या रंगांची नावे लिहा. ती नावे कोणताही दुसरा
रंग वापरून ठळक करा. उदा. लाल हा शब्द काळ्या रंगाने रंगवा. सर्व अक्षरे वेगळ्या
रंगांनी रंगवून झाल्यावर. शब्द न वाचता रंग मोठ्याने वाचून दाखवायला इतरांना
सांगा.आपला मेंदू वाचनाची क्रिया रंगाऐवजी शब्दांशी जोडतो असे आढळते.
लाल पिवळा
निळा हिरवा तपकिरी नारिंगी जांभळा
12. मोहरीच्या दाण्यांचा नाच
साहित्य – मोहरी, प्लॅस्टिकची
पिशवी, पिना भरलेला स्टेपलर.
कृती – एक प्लॅस्टिकची पिशवी घ्या. मोहरीच्या दाण्यांनी पिशवी अर्धी भरा. पिशवीचे
तोंड दोन घड्या घालून बंद करा. त्यावर स्टेपलरने आवश्यक तितक्या पिना मारा.
पिशवीचे एक टोक एका हाताच्या चिमटीने उचला. त्याच्या विरूद्ध असलेले पिशवीचे टोक
दुसर्या हाताच्या चिमटीने पकडा. पिशवी डोळ्यांसमोर धरून हळुहळू गोलाकार फिरवा.
पिशवीतले मोहरीचे दाणे नाचताना दिसतील.पिशवी फिरवताना होणार्या छोट्याश्या
घर्षणानेही स्थिर विद्यूत तयार होते.
13. टिव्हीला ट्रांझिस्टर लावला तर..
साहित्य – टिव्ही संच, ट्रांझिस्टर
कृती – टिव्ही चालू करा. एलईडी, एलसीडी टिव्ही चालणार नाही लांबट असलेलाच
हवा. एक ट्रान्झिस्टर घ्या. मोडका, बंद असलेलाही
चालेल. त्यात सेल नसले तरी चालेल. तो हळुहळू चालू टिव्ही संच्याच्या पडद्याजवळ
न्या. काही ठिकाणी पडद्यावरचे रंग, आकार बदललेले
दिसतील.टिव्ही संचातील किरण म्हणजे जोरात फेकले गेलेले इलेक्ट्रॉन असतात. त्यांचा
मार्ग चुंबकीय क्षेत्रामध्ये बदलतो.
14. भेटीची आस बोटांना
साहित्य – आपले हात
कृती – दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफा. पकड
घट्ट ठेवा. दोन्ही हाताच्या अंगठ्या शेजारची बोटे सरळ करून ताणा. त्यांची टोके
एकमेकांना जोडा. नंतर त्यांच्यात सुमारे एक सेंटीमीटर अंतर ठेवून निरीक्षण करा.
बोटे एकमेकांकडे आपोआप ओढली जातील. ती वेगळी ठेवण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे
लागतात.वक्र झाल्यावर बोटातले स्नायू नैसर्गिकपणे पकड मजबूत करू बघतात.
15. रंगीत स्क्रीनवरचे कोश
साहित्य – पाणी, रंगीत पडदा
असलेले उपकरण – टिव्ही, मोबाईल, टॅब, संगणक इ.
कृती – रंगीत पडदा असलेले एक उपकरण घ्या. ते चालू
करा. एका हाताच्या चिमटीत पाणी घ्या. रंगीत स्क्रीनजवळ चिमूट नेऊन किंचित सैल करा.
तोंडाने पाण्यावर जोरात फुंकर मारा. पाण्याचे काही शिंतोडे स्क्रीनवर पडतील.
त्यातून स्क्रीनवरचे कोश पहा. मान थोडी हलवून त्यांचे रंग तपासा.कोश लाल, हिरवा, निळा या तीन
रंगांचेच असतात.
16. कावळा काळा तरी दिसे पांढरा
साहित्य – ५ सेंटीमीटर लांबीचा कागदी चौरस, पेन्सिल, ब्रश, काळा रंग इ.
कृती – ५ सेंटीमीटर
लांबीचा एक कागदी चौरस घ्या. त्याच्यावर पेन्सिलीने कावळ्याची रेखाकृती काढा. डोळा
सोडून बाकी पूर्ण कावळा काळ्या रंगाने रंगवा. त्याच्या डोळ्याकडे एक मिनिट एकटक
पहा. मग तुमची नजर एखाद्या सपाट एकरंगी भिंतीवर न्या. तुम्हाला कावळ्याची रेखाकृती
पांढरी दिसेल.आपल्या डोळ्याच्या पटलावर झालेल्या काळ्या रंगाच्या प्रभावामुळे नंतर
तो भाग अधिक प्रकाश पाहू शकतो म्हणून तो भाग पांढरा झाल्यासारखा वाटतो.
17. भात निळा करणे.
साहित्य – शिजवलेला भात, लिंबू, आयेडाइज्ड मीठ, ताटली, डाव, छोटा चमचा, सुरी.
कृती – सुरीने कापून लिंबाच्या फोडी करून एका ताटलीत
कडेला ठेवा. ताटलीत एक डावभर शिजवलेला गरम भात घ्या. त्याच्यावर छोटा चमचाभर
आयोडाइज्ड मीठ टाका. त्याच्यावर लिंबाच्या रसाचे तीन थेंब टाका. थोडा वेळ गडद निळी
रंगछटा दिसेल.मीठातील आयोडीनची भातातील पिठूळ पदार्थाशी रासायनिक क्रिया होऊन
निळ्या रंगाचे अस्थिर संयुग तयार होते.
18. बदलत्या रंगाचे कुंकू
साहित्य – लाल कुंकू पूड. चमचा, रुमाल, ज्योत. कागद.
कृती – एका चमच्याच्या अर्ध्या दांडीला रुमाल
गुंडाळा. त्या चमचात अर्धा चमचा भरेल इतकी लाल कुंकवाची पूड घ्या. चमचातील कुंकू ज्योतीवर
घरून तापवा. ते काळे पडेल. हे काळे पडलेले कुंकू कागदावर ओता. थोड्या वेळात ते
पुन्हा लाल होईल.उष्णतेमुळे कुंकवातील जल निघून जाते म्हणून ते काळे पडते गार
होताना हवेतील बाष्प शोषून ते जलभरण करते त्यामुळे पुन्हा लाल होते.
19. हळदीचे कुंकू, कुंकवाची हळद
साहित्य – हळद पूड, पाणी, खायचा चुना, लिंबाची फोड.
कृती – हळदीची चिमूटभर पूड हातावर ठेवा. त्यावर थोडे
पाणी घाला. हातावर हात चोळून हळदीची पिवळा रंग हातभर पसरू द्या. कणीभर खायच्या
चुना हळद लावलेल्या हातावर ठेवा. पुन्हा हातावर हात ठेवून चोळा. हात कुंकवासारखे
लाल होतील. आता त्यावर दोन थेंब लिंबू रस टाका. पुन्हा हातावर हात ठेवून चोळा. हात
पुन्हा पिवळे होतील.हळदीचा रंग आम्लारी पदार्थामुळे लाल होतो तर आम्लामुळे पिवळा.
20. साखरेचा खाद्य रंग
साहीत्य – साखर, एक डाव, छोटी कढई, चिमटा, चूल, गॅस किंवा स्टोव, लांब दांडाची चमचा,
कृती – छोटा चमचा, डबी लागेल. चूल पेटवा तिच्यावर छोटी कढई
ठेवा. ती तापू द्या. तिच्यात साखरेचे २-३ दाणे घाला. साखरेचे दाणे थोडे
वितळल्यासारखे दिसले की तिच्यात डावभर साखर घाला. कढई चिमट्याने पकडून छोट्या
चमच्याने साखर हलवा. साखर वितळत जाईल तसतसा खमंग वासाचा एक तांबूस करपट रंग येतो.
त्याला कॅरॅमल म्हणतात. कढई चुलीवरून उतरवून गार झाल्यावर कॅरॅमल नंतर
वापरण्यासाठी डबीत भरून ठेवा.साखरेचे कण अर्धवट जळल्यामुळे, अर्धवट वितळल्यामुळे, त्यांच्या मिश्रणामुळे हा रंग तयार होतो.
21. कर्ब वायू ओतणे
साहित्य – पाणी, खाण्याचा सोडा, लिंबू. साधने – मेणबत्ती, काड्यापेटी, खोलगट तसराळे, बाटली.
कृती – एका बाऊलमध्ये किंवा खोलगट तसराळ्याच्या आत एक छोटी मेणबत्ती पेटवून ठेवा. एका
बाटलीत थोडे पाणी घेऊन त्यात थोडा खाण्याचा सोडा विरघळवा. त्याच्याच थोडा लिंबाचा
रस घाला. फसफसण्याची क्रिया सुरू होईल. ती थोडी कमी झाल्यावर पेटलेल्या
मेणबत्तीच्या पात्रात बाटलीतील वायू ओता. बरोबर ओतलात तर मेणबत्ती विझेल.कर्बवायू
हवेपेक्षा जड असतो म्हणून ओतला जातो.
स्त्रोत – मराठी विज्ञान परिषद पुणे http://mavipapunevibhag.blogspot.com/
हे प्रयोग इंटरनेट व सोशल मिडीयाच्या माध्यमातून संकलित केले असून विद्यार्थ्यांनी हे प्रयोग आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावे.तसेच सादर माहितीमध्ये किंवा कृती मध्ये बदल असल्यास सुचवावा.जर आपणास यातील प्रयोगांविषयी कांही आक्षेप असल्यास आम्हाला COMMENT करा..किंवा CONTACTसाठी येथे क्लिक करा… CLICK HERE