विज्ञान शाप की वरदान..?? / विज्ञानाचे फायदे-तोटे
२१व्या शतकामधे विज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आज विज्ञानाशिवाय जगणे अशक्य बनले आहे. मानवी जीवनाचा प्रत्येक भाग हा विज्ञानाशी जोडला गेलेला आहे, त्यामुळे विज्ञान हा माणसासाठी शाप की वरदान आहे हे ठरवणे खूप कठीण आहे.
तर सर्वात आधी विज्ञानाची खरी संज्ञा काय आहे हे जाणणे जरुरी आहे. आपल्याला विज्ञानाच्या खूप व्याख्या पहावयास मिळतात. वेब्स्टर शब्दकोशानुसार “विज्ञान म्हणजे अभ्यास आणि सरावातून मिळवलेले ज्ञान.” विज्ञानाची दुसरी व्याख्या अशी आहे कि “नैसर्गिक जग आणि त्यामधील प्रक्रियांचा सखोल आणि व्यवस्थित अभ्यास म्हणजेच विज्ञान होय.” आपल्या आसपासचा वस्तूंचा आणि घटनांचा सखोल अभ्यास आणि त्यातून मिळणारे ज्ञान म्हणजेच विज्ञान होय.
तर मग विज्ञान हा माणसासाठी शाप किंवा वरदान आहे हे ठरवणार कस? तर जसे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसाच विज्ञानाचे फायदे आणि तोटे हि आहेत. माणसाच्या उत्क्रांतीमध्ये विज्ञानाचाखूप मोठा हात आहे.आज आपण आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी बघतो त्या विज्ञानाची देण आहे. आपल्या घरातील टीव्ही, आपण ज्या बस ने प्रवास करतो त्यापासून आपल्या हातातील मोबाईल हे सगळं विज्ञानामुळे शक्य झालं आहे. आज आपण आपल्या घरात बसून मोबाईल आणि कॉम्पुटर च्या साहाय्याने जगातील कोणत्याही व्यक्तीशी बोलू शकतो आणि जगातील कोणत्याही वस्तू, घटना आणि जागेविषयी जाणून घेऊ शकतो.
ज्याप्रमाणे विज्ञानाने माणसाला विकासाचे दिवस दाखवले त्याचप्रमाणे अनर्थ करण्याची ताकद हि माणसाच्या हातात दिली. विज्ञानामुळे अणुबॉम्ब सारख्या घातक अण्वस्त्रांचा शोध लागला ज्यांमध्ये मानवी प्रजाती समूळ नष्ट करण्याची ताकद आहे. इंटरनेट, ज्याचा शोध माणसाचे जीवन सोपे करण्यासाठी लागला होता त्याचाच उपयोग आज खूप चुकीच्या मार्गाने केला जात आहे. ज्याप्रमाणे विज्ञान प्रगती करत गेले त्याचप्रमाणे औद्योगिकीकरण वाढले आणि पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली. महात्मा गांधी एका उक्ती मध्ये म्हणाले आहेत आहेत कि “निसर्ग माणसाला पोटभर पुरवतो फक्त माणसाने आपली भूक आवरली पाहिजे.” जशी विज्ञानाने प्रगती केली तशी माणसाची भूकही वाढत गेली. त्याने झाडे तोडली अन रस्ते व घरं बांधली. स्वतःच्या स्वार्थासाठी प्राणी मारले. आणि असाच पर्यावरणाचा छळ सुरु ठेवला. लवकरच पर्यावरणाचा ऱ्हास झाला. मग हे विज्ञान फायद्याचे कसे?
पण प्रत्येक व्यक्तीचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो म्हणून विज्ञान शाप की वरदान हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. ह्या सर्वाचा सारांश असा की जर विज्ञानाचा योग्य उपयोग केला तरच विज्ञान एक वरदान ठरेल.
– मराठी निबंध अँँप