यूपीएससी की, एमपीएससी? दोन्ही केले पाहिजेच का? |
हा निर्णय तुमचे वय, तुमच्याकडे उपलब्ध असलेले पर्यायी करिअर यावर अवलंबून आहे. असे एक पाच टक्के उमेदवार असतील की ज्यांचे ध्येय निश्चित आहे की राज्यस्तरावर काम करायचे आहे की देशस्तरावर. त्यांच्याबाबतीत प्रश्न येत नाही. पण इतरांनी दोन्ही करायला काहीच हरकत नाही. एक तर दोन्ही स्पर्धा परीक्षा आहेत. त्यांची परिक्षापद्धती व अभ्यासक्रम बराचसा समान आहे. दोन्ही देण्याचे दोन मूलभूत फायदे आहेत. एकतर सराव होतो व दुसरे म्हणजे वर्षभरात दोन निकाल हाती मिळतात. |
व्यूव्हरचना |
जरी दोन्ही परीक्षा द्यायच्या ठरल्या तरी त्यातील कोणती परीक्षा हे तुमचे मुख्य करिअर आहे, याची निश्चिती हवी. त्या परीक्षेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे व ती उत्तीर्ण झाली नाही, तर वाईट वाटले पाहिजे. राज्यसेवेचा अभ्यास अजूनही तथ्यांकडून विश्लेषणाकडे जातो, तर यूपीएससीमध्ये विश्लेषणाकडून तथ्यांकडे असा प्रवास आहे. राज्यसेवा पर्यायी प्रश्नांची परीक्षा आहे, तर यूपीएससीची मुख्य परीक्षा पूर्ण लेखी आहे. राज्यसेवेवर लक्ष केंद्रित करून ती करताना किंवा पद मिळवल्यावर यूपीएससीलाही जिंकणारे आहेत. पण अशांची संख्या कमी आहे. त्याहून जास्त संख्येने असे उमेदवार आहेत ज्यांनी यूपीएससीवर लक्ष केंद्रित केले व ती करताना राज्यसेवेतही पद काढले. |
समान अभ्यासक्रम |
काही विषय दोन्हीकडे समान आहेत. उदा. इतिहास, भूगोल, पर्यावरण, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान इत्यादी. फक्त राज्यसेवेत राज्य व देश असा भर आहे, तर यूपीएससीमध्ये देश व जग असा भर देण्यात आला आहे. राज्यसेवेचा पूर्व व मुख्य असा दोन्ही अभ्यासक्रम चांगला विस्तारून दिला आहे, तर यूपीएससीचा अभ्यासक्रम थोडक्यात दिला आहे. पूर्व परीक्षेतील पेपर दोन समान आहे. काही प्रमाणात मुख्य परीक्षेतील निबंध हा घटकही समान आहे. पूर्व परीक्षेतील शुद्ध विज्ञान व मुख्य परीक्षेत उपयोजित विज्ञान (applied science) हाही समान घटक आहे. |
असमान अभ्यासक्रम |
यूपीएससीमध्ये भारतीय संस्कृती व वारसा यावर भर आहे, तर राज्यसेवेत महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा समाविष्ट आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत शेतीविषयक अभ्यासक्रम तपशिलात आहे उदा. कृषी पर्यावरण, हवामान, मृदा व जलव्यवस्थापन. इतक्या तपशिलात हा भाग यूपीएससीच्या अभ्यासक्रमात नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांवर राज्यसेवेत भर आहे, तर आंतरराष्ट्रीय संबंध या घटकावर यूपीएससीत भर आहे. राज्यसेवेत राजकीय पक्ष आणि दबाव गट, काही उपयुक्त कायदे यांचा खास समावेश आहे. तसेच मानवी साधनसंपत्ती व मानवी हक्क हा घटक पूर्ण पेपर म्हणून आहे. यूपीएससी या घटकावर वेगळा भर नाही. नैतिकता व मानवी मूल्ये यावर यूपीएससी अभ्यासक्रमात सामान्य अध्ययनात संपूर्ण पेपर आहे. राज्यसेवेत त्यावर काहीच नाही. |
समान-असमान यांची बेरीज |
समान अभ्यासक्रम कोणता व असमान कोणता हे एकदा निश्चित झाले की पुढचा टप्पा म्हणजे असमान अभ्यासक्रमाच्या वेगळ्या नोट्स तयार करणे. काही वेळा समान अभ्यासक्रमातील काही तथ्ये ही फक्त राज्यसेवेला लागणारी असू शकतील. अशावेळी दोन वेगळ्या रंगांचे पेन वापरल्यास एकाच नोट्समध्ये फरक करणे सोपे जाईल. अशाप्रकारे अभ्यासक्रमाची बेरीज करून यशाचा गुणाकार मिळू शकतो. |
(संकलित लेख) |