इयत्ता – आठवी
विषय – मराठी
पाठावरील प्रश्नोत्तरे
22. संत वाणी
ऐसे केले या गोपाळे
संत परिचय –
शेख महमद: शेख महंमद हे वारकरी पंथातील एक कवी होते. ते संत एकनाथांच्या काळातले होते. त्यांचे मूळ गाव नगर जिल्ह्यातील रुईबाहिरे आहे. ते जन्माने मुसलमान होते पण वारकरी संप्रदायाच्या तत्त्वांनी प्रभावित होऊन त्यांनी काव्यलेखन सुरू केले. त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह ‘योगसंग्राम’ आहे.
मूल्य: भक्ती
साहित्य प्रकार: प्राचीन काव्य
संदर्भ ग्रंथ: योगसंग्राम
मध्यवर्ती कल्पना:
शेख महंमद यांच्या या अभंगात भक्ती आणि ज्ञानावर आधारित तत्त्वज्ञान मांडले आहे.ते भेदभावांना नाकारून अंतःकरणातील निर्मळ भक्ती आणि ज्ञानाला महत्त्व देतात. बाह्यरूप महत्त्वाचे नसून, मनाची शुद्धता आणि ईश्वरभक्ती यांनाच खरी किंमत आहे, असे कवी सांगतात. उदाहरणाद्वारे ते स्पष्ट करतात की जसे काटेरी झाडात सुगंधी केवडा किंवा कठीण नारळात गोड पाणी असते, तसेच माणसाचे बाह्यरूप काहीही असो, त्याच्या अंतःकरणात ईश्वर असतो. हा अभंग भक्तीमय जीवनाचा आणि आंतरिक शुद्धतेचा उपदेश करतो.
शब्दार्थ आणि टीपा
सोवळे: शुद्ध, पवित्र
ओवळे: अशुद्ध, अपवित्र
वरूचा: वरून दिसणारा
जीवन: पाणी
अविंध: मुसलमान
केतकी: केवडा (एक प्रकारचे फुलझाड)
स्वाध्याय
प्र. 1: खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. गोपाळाने काय केले?
उत्तर: गोपाळाने ओवळे-सोवळे पाहिले नाही.
2. केतकीच्या झाडात काय जन्मते?
उत्तर: केतकीच्या झाडात केवडा जन्मतो.
प्र. 2:खालील प्रश्नाचे उत्तर तीन-चार वाक्यात लिहा.*
1. आपण मुसलमान असूनही पांडुरंगाची भक्ती करतो हे दाखवण्यासाठी शेख महमद कोणती उदाहरणे देतात?
उत्तर: शेख महंमद यांनी बाहेरून दिसणाऱ्या गोष्टींवरून भक्ती मोजू नये असे सांगताना काही उदाहरणे दिली आहेत. ते म्हणतात की केतकीच्या झाडाला काटे असले तरी त्याच झाडात सुंदर केवडा फुलतो. फणसाला बाहेर काटे असले तरी आत मधुर गरे असतात. नारळ वरून कठीण दिसतो पण त्याच्या आत गोड पाणी असते. तसंच, जरी मी जातीने मुसलमान (अविंध) आहे तरी माझ्या हृदयात गोविंद वास करतो. मी त्याच्याच भक्तीत रमतो.
कवितेचा सारांश
शेख महंमद जन्माने मुसलमान होते पण वारकरी पंथाने प्रेरित होऊन त्यांनी भक्तीमय कविता लिहायला सुरुवात केली. या अभंगात ते सांगतात की, भक्ती करण्यासाठी बाह्य शुद्धतेचा (ओवळे-सोवळे) विचार करणं आवश्यक नाही. गोपाळाने (विठ्ठल) भक्ताच्या मनातील भक्ती महत्त्वाची मानली आहे, बाहेरचं दिसणं नाही. जसे केतकीच्या झाडाला काटे असूनही त्यात केवड्याचं फूल असतं. फणसाला बाहेर काटे असूनही आत रसाळ गरे असतात. नारळ कठीण दिसतो, पण त्यातलं पाणी गोड असतं. तसंच, मी मुसलमान असूनही माझ्या हृदयात गोविंदचं स्थान आहे. कवी सांगतात की, भक्त कोणत्या जाती-धर्माचा आहे, याला महत्त्व नाही; त्याच्या मनातील भक्ती हीच भगवंताला महत्त्वाची वाटते.