गणिताची उगाचच वाटणारी भीती संपवण्यासाठी अफलातून टिप्स

वाचून झाल्यावर खाली कमेंट करायला विसरू नका….


गणिताची उगाचच वाटणारी भीती संपवण्यासाठी अफलातून टिप्स


     गणित! ह्या विषयाचे नुसते नाव जरी काढले तरी अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक भीती दाटून येते.

       गणित हा विषय खूप सोपा आहे, इंटरेस्टिंग आहे असे अनेक लोक म्हणत असले तरी बहुसंख्य विद्यार्थ्यांचे ह्या विषयामुळे तोंडचे पाणी पळालेले असते. आणि ही भीती दूर करण्यासाठी आपल्या शिक्षणपद्धतीत फारसे प्रयत्न देखील होत नाहीत.
   गणित एक तर येतं किंवा येत नाही. ह्यात मधला मार्गच नसतो. लहानपणापासूनच ह्या विषयाने लहान मुलांच्या मनात इतकी धास्ती निर्माण करून ठेवलेली असते की लहान मुलं देवाकडे प्रार्थना करतात,

“भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर?”

    म्हणजेच शारीरिक त्रास झाला तरी चालेल पण गणिताचा पेपर नको असा विचार लहान लहान मुलांच्या डोक्यात येतो इतकी गणिताची धास्ती, दडपण काही मुलांना असते ही वस्तुस्थिती आहे.

   लहानपणापासूनच एखाद्याला हा विषय खूप आवडतो, पटकन जमतो पण एखाद्याला हा विषय पार रडकुंडीला का बरं आणत असावा?

खरं तर आपल्या मनात एखाद्या विषयाबद्दलची ही भीती उपजतच नसते. तर ती ग्रहण केलेली असते.

   आपल्याला आलेले अनुभव, आपल्या आजूबाजूच्यांना, मोठ्या माणसांना आलेले अनुभव, त्या विषयाबद्दलची ऐकीव माहिती आणि परिस्थिती ह्यामुळे आपण एखाद्या विषयाबद्दलची भीती बाळगायला लागतो.

    गणित म्हणजे रुक्ष, कंटाळवाणा विषय असं म्हणणारे आजूबाजूला असतील, गणित म्हणजे कठीण विषय, पास कसे होणार ह्याची चिंता आजूबाजूला कुणी सतत करत असेल तर-

   त्या घरातल्या लहान मुलाची गणित शिकण्याची सुरुवातच “हा अतिशय कठीण, कंटाळवाणा, नीरस विषय आहे” अशीच होते.

   त्या विषयाबद्दल मनात अढी आणि भीती बसते. आपल्याला हे जमणार नाही, कठीण आहे असा विचार मुलं करू लागतात, मार्कांची चिंता त्या भीतीत आणखी भर घालते.

      विविध भाषा,सामान्य ज्ञान ह्यांची ओळख मुलांना फार आधीपासूनच होते. शाळेत जाऊ लागल्यानंतर आहे त्या ज्ञानात भर पडत जाते. पण गणित शिकवताना हे कमी प्रमाणात होतं.

         गणितात काहीतरी अमूर्त संकल्पना असतात. आणि ते लिहिले जाते चिन्हांद्वारे, आपल्या रोजच्या भाषेत नाही…म्हणूनच हा विषय फारच अवघड आहे बुवा असा समज मनात दृढ होऊ लागतो.

    ती भाषा आणि चिन्ह व्यवहारात वापरली जातात, पण त्यांची लहानपणी ओळख नसल्याने ती परकी वाटतात. आणि बहुतांश विद्यार्थी आणि गणिताची पहिली भेट निराशाजनकच होते.

     इथूनच त्या भीतीचे बी मनात रुजते आणि हळू हळू ती भीती मोठ्या वृक्षासारखी मनात फोफावते. लहानसहान उदाहरणांतून शिकत पाया पक्का झाला नाही तर त्या माणसाला आयुष्यभर गणित हा शत्रूच वाटतो.

     काही शिक्षक सुद्धा शिकवताना “नीट लक्ष द्या, हा कठीण विषय आहे, हे सोपं नाही” असं सतत म्हणून मुलांच्या मनात कळत नकळत गणित हा कठीण विषय आहे असे रुजवत असतात.

   तसेच परीक्षेच्या आधी येणारे दडपण पालक व मुलं ह्यांना नीटपणे न हाताळता आल्याने “आपल्याला गणित येत नाही, कधीच येणार नाही” हा समज मनात पक्का बसतो.

   गणित विषय म्हटला की जबरदस्त टेन्शन घेणारी अनेक मुलं आहेत, त्यामुळे त्यांची गणिताच्या परीक्षेआधी तब्येत सुद्धा बिघडते. ह्या मानसिक त्रासाला “मॅथ अँझायटी” असे म्हणतात.

   प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ मार्क अशक्राफ्ट ह्यांनी मुलांना वाटणारी गणिताची भीती ह्यावर अभ्यास करून “मॅथ अँझायटी” बद्दल शोधून काढले.

    आज ह्या “मॅथ अँझायटी”साठी सल्ला घेण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मानसोपचार तज्ज्ञ तर मार्ग सांगतातच.

    पण आज आपण घरच्या घरी करता येण्यासारखे काही उपाय बघणार आहोत जेणे करून तुमच्या घरात असणाऱ्या विद्यार्थ्यांची गणिताची भीती कमी होऊ शकेल.

१. सकारात्मक दृष्टिकोन

आपल्याकडे एक प्रचंड मोठा गैरसमज आहे की ज्याचे गणित चांगले, तोच विद्यार्थी हुशार आहे. खरे तर प्रत्येकाच्या अंगात काही उपजत कलागुण असतात. प्रत्येकाची हुशारी वेगवेगळ्या गोष्टींत असते.

हे सगळे मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागावर अवलंबून असतं हे अनेकदा सिद्ध झाले आहे. पण तरीही गणित जमत नाही म्हणजे मूर्ख, “ढ” आहे असाच समज मुलांच्या मनात भरवून दिला जातो.

ह्याने लहान मुलांचा, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. मनात अकारण स्वतः:विषयी नकारात्मक भावना येते.

ज्यांना अश्या नकारात्मक भावनेने आणि गणिताच्या भीतीने ग्रासले आहे त्यांच्या मनात सकारात्मक विचार यावेत म्हणून त्यांना जे चांगले येते, जमते त्याविषयी कौतुक केले पाहिजे. त्यांच्या इतर कलागुणांना वाव दिला पाहिजे.
   तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन त्यांच्या मनातली भीती घालवली पाहिजे. त्यांच्या मनात तयार होणारी सकारात्मक भावना त्यांना अभ्यासावर जास्त चांगले लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल.

२. भीतीला धाडसाने तोंड द्या, त्याविषयी चर्चा करा

“असे कसे तुला येत नाही? हे न जमायला काय झाले?” असा ऍटिट्यूड न ठेवता तुमच्या मुलांशी गणित येत नाही म्हणजे त्यातले नेमके काय कळत नाहीये, कुठला विषय अवघड जातोय ह्याबद्दल मोकळेपणाने चर्चा करा.

“हे तर इतके सोपे आहे, ह्यात न कळण्यासारखे काय आहे” असे न म्हणता त्यांना तो विषय समजेल अश्या पद्धतीने शिकवा.

आपल्या पाल्याला गणित अवघड जातेय हे प्रथम पालकांनी स्वीकारणे आवश्यक आहे तरच त्यावर काही उपाययोजना करता येऊ शकेल.

३. नियमितपणे सराव करा.

“प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट” ह्या उक्तीप्रमाणे नियमितपणे गणिताचा सराव करा. पालकांनी आपल्या पाल्यांकडून गणिताचा सराव करून घ्या. नियमित सराव हे यशाचे गमक आहे.

रोज इतकी उदाहरणे सोडवली गेली पाहिजेत असे ठरवून तितका सराव पूर्ण करा. सुरुवात थोड्याने करून नंतर रोज हळू हळू उदाहरणांची संख्या वाढवत नेली तर पाल्यावर सुद्धा सरावाचे दडपण येणार नाही.

घरी पालक गणित शिकवू शकत असतील तर उत्तमच, नाही तर “पर्सनल अटेन्शन” देणारी शिकवणी लावा जिथे मुलांच्या शंका त्यांना मोकळेपणाने विचारून सोडवता येतील.

४. शिकवण्याची पद्धत सोपी व मनोरंजक असावी

गणित असो की भाषा, जर शिकवणाराच नीरस आणि रुक्ष पद्धतीने शिकवत असेल तर मुलांना त्या विषयाबद्दल मनात अढी बसणारच. कठीण गणिते सुद्धा सोप्या पद्धतीने “स्टेप बाय स्टेप” शिकवता येऊ शकतात.

    लहान मुलांच्या पालकांनी लहानपणापासूनच मुलांना मनोरंजक गणितीय कोडी, गेम्स खेळायची सवय लावली तर मुलांना गणिताची गोडी लागण्यास मदत होते.

   आता तर अनेक मोबाईल ऍप्स सुद्धा आहेत ज्यामुळे गणित शिकणे आणि शिकवणे दोन्ही सोपे करता येऊ शकेल.

६. गणिताकडे एक सर्जनशील (क्रिएटिव्ह) विषय म्हणून बघायला शिका

     भाषा, कला म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह असतं, आणि गणित हा रुक्ष नीरस विषय आहे सामान्यपणे असा समज जनमानसांत आढळतो.

    पण गणित सोडवताना सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारांनी उत्तर काढू शकता, म्हणजेच गणितात सुद्धा सर्जनशीलतेला वाव आहे.

     लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटी बेस्ड गणित करणे केव्हाही चांगले, त्यातून मुलांना गणिताची गोडी लागते आणि मुलं गणित शिकताना कंटाळत नाहीत.

७. दैनंदिन जीवनात गणिताचा वापर

    बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पाढे ह्यासारख्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात रोजच करतो.

   लहान मुलांना लहान लहान आकड्यांचे हिशोब, बेरीज, वजाबाकी करायला दिल्याने त्यांच्यातला आकडेमोड करण्याविषयीचा आत्मविश्वास वाढतो. गणित हा फक्त शाळेत शिकण्याचा विषय नसून दैनंदिन जीवनाचा भाग आहे असा विचार त्यांच्या मनात रुजतो.

पोळीचे तुकडे करून तुम्ही लहान मुलांना फ्रॅक्शन्स शिकवू शकता, स्वयंपाक करताना इतक्या माणसांना इतके जेवण लागते तर इतक्या माणसांना किती लागेल असे त्रैराशिक कसे मांडायचे हे मजेत रोजच्या उदाहरणांतून शिकवू शकता.

  थोड्या मोठ्या मुलांना फायदा नुकसान (प्रॉफिट लॉस), बँकेचे व्यवहार शिकवताना व्याज, मुद्दल वगैरे शिकवू शकता.

  अशाने मुले व्यावहारिक ज्ञान तर शिकतीलच शिवाय आकडेमोड आणि गणित सुद्धा त्यांना दैनंदिन जीवनात किती आवश्यक आहे हे लक्षात येऊन ते गणिताचा कंटाळा कमी करतील.

ह्याशिवाय हल्ली गणित शिकण्यासाठी अनेक ऍप्लिकेशन्स, व्हिडीओज ऑनलाईन उपलब्ध आहेत. गणित शिकण्यासाठी मोबाईल गेम्स सुद्धा आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लावू शकता.
    एकदा गोडी लागली की मग हळूहळू त्याचा सराव करून, शंका निरसन करून गणिताची भीती कमी होऊ शकेल.
     एकदा गणित आलं म्हणजे काम झालं असं नव्हे तर नियमित सराव करून सतत गणिताचे ज्ञान पॉलिश करत राहणे महत्वाचे आहे. ‘असाध्य ते साध्य करीता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे’ हे तुकोबांचं वचन गणितालाही शंभर टक्के लागू होतं.ह्याशिवाय ताण कमी करण्यासाठी नियमितपणे प्राणायाम आणि श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा सराव केल्यास अभ्यासातली एकाग्रता सुद्धा वाढते.
    गणिताचा तणाव आणि भीती घालवण्याचा आणखी एक चांगला उपाय म्हणजे वैदिक गणित शिकून घेणे. वैदिक गणितात अश्या अनेक टिप्स आहेत ज्याने आकडेमोड पटापट जमते आणि ती सहसा चुकत नाही. वैदिक गणितात आकडेमोड सोप्या पद्धतीने व अचूक कशी करावी हे शिकवले जाते. म्हणूनच वैदिक गणित शिकल्यास गणिताची निम्मी भीती कमी होऊ शकेल.
तर आजपासून गणिताला शत्रू समजणे बंद करा, त्याची भीती मनातून काढून टाका. हे उपाय करा आणि हसतखेळत गणित एन्जॉय करा.

       वाचून झाल्यावर खाली कमेंट करायला विसरू नका….
Share with your best friend :)